Last Updated on 03 Mar 2026 11:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठी तयारी केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, कोणत्याही अल्पकालीन व्यत्ययाला तोंड देण्यासाठी देशाकडे कच्चा तेल, पेट्रोल, डिझेल आणि एटीएफचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
जागतिक पातळीवर, भारत हा पेट्रोलियम उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा आयातदार, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पाचवा सर्वात मोठा निर्यातदार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या अल्पकालीन व्यत्ययांना तोंड देण्यासाठी देशाकडे कच्च्या तेलाचा तसेच पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ यांसह महत्त्वाच्या पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही वर्षात भारताने स्त्रोतांच्या वैविध्यकरणाद्वारे आपल्या लोकसंख्येसाठी ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरता, दोन्ही सुनिश्चित केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भारतीय ऊर्जा कंपन्यांना आता होर्मूझच्या सामुद्रधुनी मार्गे न येणारा ऊर्जा पुरवठाही उपलब्ध आहे. त्यामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीमार्गे येणाऱ्या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्यास ही पर्यायी जहाजे उपलब्ध होऊन पुरवठ्यात साहाय्यभूत ठरतील.
२४ तास नियंत्रण कक्ष तैनात
देशभरातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर आणि साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. “भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे नमूद करत पुरी यांनी सरकार सध्याच्या साठ्याबाबत समाधानी असल्याचे सांगितले. परिस्थितीनुसार सरकार टप्प्याटप्प्याने पुढील उपाययोजना करण्यास सज्ज आहे.












































































