Last Updated on 25 Mar 2026 8:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजासाठी सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता अखेर वितरित करण्यात आला आहे. मुंबईतील विधान भवन येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर १७९८.७८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

या दिमाखदार समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वितरणासह राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधिक बळकटी मिळाली आहे.
राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेरपर्यंत अत्यंत प्रभावी काम झाले आहे. आतापर्यंत पहिल्या हप्त्यापासून सातव्या हप्त्यापर्यंत एकूण १३०१७.३० कोटी रुपये सुमारे ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आज वितरित झालेला आठवा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी शेतीकामांच्या नियोजनासाठी आधार ठरणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून, अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी, अकोला ₹३६.७६ कोटी, अमरावती ₹५३.३४ कोटी, बीड ₹७२.७० कोटी, भंडारा ₹४१.६५ कोटी, बुलढाणा ₹६६.७४ कोटी, चंद्रपूर ₹४७.९५ कोटी, छत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटी, धाराशिव ₹४६.८५ कोटी, धुळे ₹३०.६३ कोटी, गडचिरोली ₹२८.५० कोटी, गोंदिया ₹४२.४५ कोटी, हिंगोली ₹३५.०० कोटी, जळगाव ₹७७.४० कोटी, जालना ₹५८.८२ कोटी, कोल्हापूर ₹९२.३३ कोटी, लातूर ₹५३.८७ कोटी, नागपूर ₹३३.८८ कोटी, नांदेड ₹७६.५० कोटी, नंदुरबार ₹२०.४७ कोटी, नाशिक ₹८३.८६ कोटी, पालघर ₹१९.९५ कोटी, परभणी ₹४९.७९ कोटी, पुणे ₹८५.२४ कोटी, रायगड ₹२२.७९ कोटी, रत्नागिरी ₹ ३१.२१ कोटी, सांगली ₹७५.४९ कोटी, सातारा ₹८७.०७ कोटी, सिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटी, सोलापूर ₹९७.५२ कोटी, ठाणे ₹१४.१८ कोटी, वर्धा ₹२५.६० कोटी, वाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.










































































