Last Updated on 23 Jan 2026 11:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
ईश्वरपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या “मुक्ताविष्कार” महोत्सवात गीत, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन व मनोरंजनाचा सुरेख संगम सादर करत उपस्थित पालक व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
येथील राजारामबापू नाट्यगृहात मुक्तांगण प्ले स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मुक्ताविष्कार” महोत्सवात चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली. विविध गीत-नृत्य, अभिनय आणि संदेशपर सादरीकरणांतून बालकलाकारांनी आपले कलागुण प्रभावीपणे सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात “लल्लाटी भंडार” या सादरीकरणाने झाली. त्यानंतर “नाच रे मोरा”, “लुंगी डान्स”, “तुरु-तुरु चालू नको” अशा लोकप्रिय गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तामिळी नृत्याच्या माध्यमातून भगवान शंकराची आराधना करण्यात आली. “गोविंदा” नृत्याच्या थीमवर सादर झालेल्या अदाकारीला विशेष दाद मिळाली.
“आईस्क्रीम खायोगे” या गीतावरील अभिनयाने प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळली. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांवरील प्रेरणादायी गीताने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली. दंगल चित्रपटाच्या थीमवर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमातून व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “बम बोले” म्हणत रंगीबेरंगी मलिंगा कॅप घालून सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला वेगळीच रंगत मिळाली.
“आली कडकलक्ष्मी आली” या सादरीकरणातून चिमुकल्यांनी अभिनयाचा सुंदर आविष्कार सादर केला. तर “भुरूम-भुरूम” या दुचाकीवरील गंमत-जंमत सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले. कार्यक्रमात महिला पालकांनी “ताल से ताल मिला” या गीतावर उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
मुक्तांगणच्या चिमुकल्यांच्या मुक्ताविष्काराने पालक भारावून गेले. बालकलाकारांचा आत्मविश्वास, उत्साह आणि सादरीकरणातील सहजता यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
नगरसेवक शिवाजी जाधव, स्वरूप मोरे उपस्थित होते. पालकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विनोद मोहिते व सरोजनी मोहिते यांनी स्वागत केले. वर्षाराणी मोहिते यांनी आभार मानले. सई व रिया मोहिते, धनश्री पाटील, प्रगती मोरे, अजिजा मुंडे व ऋतू धनवडे यांनी संयोजन केले.
मोबाईल वापर टाळा…व्यायाम करा..मुलांच्या कडून सामाजिक संदेश..!
चार माकडांच्या कथेतून मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा प्रभावी संदेश मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीने दिला. मोबाईल वापर टाळा.. व्यायाम करा..असा मुलांच्या कडून सामाजिक संदेश देण्यात आला. मनोरंजनासोबत समाजप्रबोधन करणाऱ्या या सादरीकरणाने पालक व मान्यवरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि कार्यक्रमाला सामाजिक भानाची दिशा दिली.







































































