Last Updated on 01 Nov 2022 4:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अद्याप नियुक्ती न झालेल्या 1 हजार 143 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळण्याबाबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात येतील असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी खोत यांना दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.कागदोपत्री अधिकारी असलेले तब्बल 1 हजार 143 उमेदवार प्रशासन व सरकारच्या दिरंगाईमुळे प्रचंड मानसिक तणाव व नैराश्यातून जात आहेत.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान आझाद मैदानावर साखळी उपोषण करणार असल्याचे या उमेदवारांकडून जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे आज (मंगळवारी) माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की,सरकारच्या मृद व जलसंधारण, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम या तीन खात्यांमध्ये क्लास 1 आणि क्लास 2 च्या अभियंत्यांच्या तब्बल 1 हजार 143 जागा आहेत. या पदांची जाहिरात 3 एप्रिल, 2019 रोजी प्रसिद्ध झाली, विविध आरक्षण व न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रक्रिया लांबत गेली आणि त्यानंतर 10 जून, 2022 रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या सगळ्या प्रक्रियेसाठी तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक कालावधी गेला.
एप्रिल महिन्यात परीक्षेचा निकाल लागून 1 हजार 143 अभियंत्यांची निवडही करण्यात आली.मात्र,आता चार महिने उलटून गेल्यावरही निवड झालेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाकडून आदेश अद्याप प्राप्त न झाल्यामुळे त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. तरी सदर विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ न आणता त्यांना तात्काळ नियुक्ती देणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत असे सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.










































































