Last Updated on 06 Nov 2021 11:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
ना खाजगी शिकवणी,ना 50 हजार रुपये फी भरून ऑनलाईन शिक्षण तरीही घवघवीत यश
![]()
सांगली ।
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील अंकिता संपत मोहिते व मनाली माणिकराव थोरात विद्यार्थिनींनी MHT-CET 2021 परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
गरीब कुटुंबातुन आलेल्या,कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता,स्वतःवर व कॉलेजच्या प्राध्यापकांच्यावर प्रचंड विश्वास दाखवून MHT-CET 2021 या परीक्षेमध्ये अनुक्रमे 99.5246777 व 95.8396839 परसेंटाईल इतके गुण त्यांनी मिळवले.
खेडेगावातल्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन विद्यार्थिनींचे कौतुक यासाठी होत आहे.एकीकडे बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरी सर्व सोयीसुविधा असताना,प्रत्येक विषयासाठी 5 हजारापासून ते 50 हजार रुपये फी भरून,शहरगावात कॉलेजच्या जवळ स्वतंत्र खोली घेऊन,ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली अँड्रॉइड मोबाईल,एवढे सगळं करूनसुध्दा फक्त नाममात्र गुणांनी पास होणारे विद्यार्थीही आपण पाहतो.
परंतु अंकिता मोहिते ही मोहिते वडगाव सारख्या खेडेगावातील मुलगी की तिचे आई-वडील शेती तसेच शेतमजुरी करतात,कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व अँड्रॉइड मोबाइल खरेदी करून ऑनलाईन अभ्यासिका करण्याची परिस्थिती नसतानाही केवळ आपले चुलत्यांच्या मोबाईलवर युट्युबवरील व्हिडीओ पाहून अभ्यास करण्याची जिद्द तिने ठेवली,घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल व हलाखीची असल्याने तसेच शिक्षणाच्या प्रेरणेसाठी घरात कोणीही उच्चशिक्षित नव्हते तरीसुद्धा स्वयंप्रेरणेने व कॉलेजच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने अंकिताने उज्वल यश संपादन केले.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण करत अंकिताने तब्बल २६ कि.मी.चा प्रवास करून इस्लामपूर येथे विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला,मुलींसाठी मोफत पासची सुविधा असल्यामुळेच ती दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण करू शकली,१२ वी मध्ये 96.36 टक्के गुण मिळवले आणि पुढे MHT- CET परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त केले अंकिताने पुढे औषध निर्माणशास्त्राचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा मानस केला आहे.
अंकिताप्रमाणेच तिची मैत्रीण बहे-खरातवाडी (ता.वाळवा) गावची मनाली माणिकराव थोरात या विद्यार्थिनीनेही रोज एसटीने ये-जा करून व कोणत्याही खाजगी शिकवणी शिवाय केवळ शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन घेऊन,अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन केले,6 वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरवलेल्या मनालीने न डगमगता त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार मनी ठेवून बारावी मध्ये 97.66 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले तसेच MHT-CET परीक्षेत 95.83 पर्सेंटाइल इतके गुण प्राप्त करून स्वतःला सिद्ध केले आहे.मनाली पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन वडिलांचे लाल दिव्याचा अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
बहे येथील अनुजा कैलास पाटील हिला भौतिकशास्त्र विषयात ९४ परसेंटाईल मिळाले आहेत.
खरंतर कॉलेजमध्ये रोज जेवढे शिकवून होईल त्याचा अभ्यास करून, त्यातूनही काही कमी पडले तर स्वतः वाचून-समजावून घेऊन प्रामाणिकपणे अभ्यास करून,पालकांना व स्वतःला न फसवता,या एकविसाव्या शतकातसुदधा 11वी 12 वी च्या वर्षात फक्त 4 ते 5 हजार रुपयांत खरंच योग्य शिक्षण घेणाऱ्या या जिद्दी,कष्टाळू, होतकरू विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमीच.
एकूणच याचा अर्थ असा की,फक्त पैसे खर्च करणे म्हणजे शिक्षण नव्हे,तर स्वत:वरती पूर्ण विश्वास ठेवून,शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जर प्रामाणिकपणे,सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश नक्की मिळेल.
या विद्यार्थिनींना वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव अॅड.बी.एस.पाटील,सहसचिव अॅड.धैर्यशिल पाटील तसेच प्राचार्य संजय पाटील,विभाग प्रमुख प्रा.शशिकांत पाटील,प्रा.संजय नागरगोजे,प्रा.बी.ऐ.शिरोटे,प्रा.रमेश पाटील,प्रा.संभाजी महिन्द,प्रा.मकरंद बडवे,प्रा.हर्षल पाटील,प्रा.मनोज करळे,प्रा.विजयकुमार शिंदे,प्रा.सौ.एस. एन.पाटील,प्रा.सौ.एस.बी.पाटील,प्राध्यापिका वाय.आर.माने,प्राध्यापिका एम.व्ही.विभुते,प्राध्यापिका ए.टी.पाटील,प्राध्यापिका सुजाता देसाई,प्रा.सिंधुताई खोत,प्रा.विजय जाधव,प्रा.अशोक धुमाळ,प्रा.डी.एस.मुल्ला आदींचे मार्गदर्शन लाभले.
![]()















































































