Last Updated on 13 Mar 2026 12:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
मुंबई ।
राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मात्र काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यासह महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या, अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, तर पुण्यात आज ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
विदर्भातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात चक्राकार वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे, ज्यामुळे अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसली तरी, विदर्भ आणि कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवू शकतात.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.












































































