Last Updated on 04 Mar 2026 11:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई ।
राज्यातील पॅथोलॉजी लॅबची गुणवत्ता, अचूकता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याचा शासनाचा प्रयत्न असून तो चालू अधिवेशनात मांडण्याचा मानस आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील पॅथोलॉजी लॅबची गुणवत्ता, तपासण्यांची अचूकता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा प्रभावी होण्यासाठी अचूक निदान अत्यावश्यक आहे. लॅबमधील तपासण्या दर्जेदार आणि विश्वासार्ह असतील तरच रुग्णांना योग्य उपचार देता येतील.
मंत्री श्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील गावपातळीपासून ते मोठ्या शहरांतील रुग्णालयांपर्यंत सर्व पॅथोलॉजी लॅबचे नियमन, नोंदणी व मॉनिटरिंग करण्यासाठी स्पष्ट आणि सर्वसमावेशक कायद्याची आवश्यकता आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील अधिकारविभागणीबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्यासाठी सुसंगत कायदा करण्यात येणार आहे.
या प्रस्तावित कायद्यात लॅब टेक्निशियनची शैक्षणिक गुणवत्ता, उपकरणांची प्रमाणितता, तपासण्यांची अचूकता, तसेच नियमित तपासणी व देखरेख यांसंबंधी तरतुदी करण्यात येतील. कायदा तयार करताना सर्व लोकप्रतिनिधी, संबंधित तज्ज्ञ व घटकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.










































































