Last Updated on 30 Dec 2025 3:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महसूल विभाग म्हणजे प्रशासनाचा कणा. सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, जमिनीचे हक्क, नोंदी, परवानग्या, कर वसुली ते नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत–पुनर्वसन अशी असंख्य महत्त्वाची कामे याच विभागाच्या माध्यमातून पार पडतात. त्यामुळेच महसूल विभागाला ‘नागरिकांचा जिव्हाळ्याचा विभाग’ असे संबोधले जाते.
नागरिकांना सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ मिळाव्यात यासाठी महसूल विभागात आता ई-प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, विविध शासकीय परवानग्या, शासकीय जमिनीचे व्यवस्थापन, शस्त्र परवाना, कर आकारणी व वसुली यांसारख्या कामकाजात तंत्रज्ञानाची जोड दिल्याने प्रक्रिया सुस्पष्ट आणि वेळेत पूर्ण होऊ लागली आहे.
मात्र, या सर्व व्यवहारांदरम्यान वापरले जाणारे महसूली शब्द, संज्ञा आणि प्रशासकीय भाषा अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांना गुंतागुंतीची वाटते. सातबारा, फेरफार, नोंद, हक्क, परवानगी यांसारखे शब्द ऐकायला परिचित असले, तरी त्यांचा नेमका अर्थ, उपयोग आणि त्यामागील प्रक्रिया अनेकांना स्पष्ट नसते.
याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाशी संबंधित कामकाज अधिक समजण्यास सोपे व्हावे, नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा आणि प्रशासकीय व्यवहारांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या लेखाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या महसूली शब्दांचे अर्थ सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
निस्तारपत्रक
निस्तारपत्रक म्हणजे गावातील सर्व सार्वजनिक जमिनींच्या वापराबाबतचा अधिकृत नकाशा व नियमांची यादी. गावात ज्या जमिनी वैयक्तिक मालकीच्या नसतात जसे की तलाव, रस्ते, नदीकाठची जमीन, स्मशानभूमी, चराई जमीन, सार्वजनिक जागा त्या जमिनींचा कशासाठी आणि कसा वापर करायचा याची संपूर्ण योजना या पत्रकात दिलेली असते.
निहित
निहित म्हणजे जमीन किंवा मालमत्ता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला वापरासाठी देणे, परंतु मालकी हक्क न देणे. ज्या व्यक्तीकडे जमीन निहित केली जाते, त्याची स्थिती कनिष्ठ धारकासारखी असते. म्हणजेच तो जमीन फक्त दिलेल्या मर्यादेत वापरु शकतो.जमीन ज्या विशिष्ट कारणासाठी निहित केली आहे ते काम किंवा उद्देश शासनाच्या परवानगीशिवाय बदलता येत नाही.
निखात निधी
निखात निधी अर्थात जमिनीखाली लपलेला किंवा दडलेला मौल्यवान खजिना जसे की दागिने, सोने- चांदीची नाणी किंवा रुपये किंवा मौल्यवान वस्तू. जमीन नांगरताना, खोदताना किंवा काम करताना असा मौल्यवान खजिना सापडता तर भारतीय निखात निधी कायदा 1878 नुसार सरकारला कळविणे तसेच पुढील प्रक्रिया करणे आवश्यक असते.
कनकूत
कनकूत म्हणजे शेतातील उभ्या पिकाच्या उत्पादनाचा अंदाज लावण्याची महसूली पद्धत. यामध्ये पिकाची वाढ, दाण्यांची संख्या आणि पिकाची एकूण घनता यासारख्या घटकांचा विचार करुन कापणीनंतर किती उत्पादन मिळेल याचा अंदाज घेतला जातो.
जिन्नसवार
जिन्नसवार म्हणजे गावात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांची अधिकृत नोंद. गावात कोणती पिके जास्त प्रमाणात घेतली जातात, कोणते पीक त्या भागाचे प्रमुख उत्पादन मानले जाते, याची माहिती या यादीत असते. ही नोंद महसूल नोंदीसाठी उपयुक्त ठरते.
वरसाल
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर किंवा त्याने मृत्यूपत्र लिहून ठेवले असल्यास, त्या आधारावर मालमत्तेची नावात होणारी बदल नोंद म्हणजे वरसाल.
पारडी जमीन
पारडी जमीन म्हणजे गावठाणातील घरांच्या लगत किंवा सभोवती असलेली, शेतीयोग्य पण मुख्यत: घराशी संबंधित वापरात येणारी लागवडीची जमीन.
स्वामित्वधन
जमिनीचा पृष्ठभाग कोणच्याही मालकीचा असला तरी त्याखालील खनिजे शासनाच्या मालकीची असतात. कोणत्याही व्यक्तीस अशा खनिजाचे उत्खनन करुन त्याचा उपयोग करावयाचा असल्यास त्यास त्या खनिजांचे स्वामित्वधन (रॉयल्टी) शासनास द्यावे लागते. तसेच त्यावर स्थानिक उपकरही भरावे लागतात.
विहीर बागायत
ज्या जमिनीत शेतीसाठी पाणी विहिरीतून उपलब्ध होते, त्या जमिनीला विहीर बागायत म्हणतात. या पद्धतीत विहिरीतील पाणी मोट, पंप किंवा विद्युत पंपाद्वारे शेतात सोडले जाते.
पाटपाणी बागायत
पाटपाणी बागायत म्हणजे नदी, कालवा किंवा तलावातून पाटाद्वारे शेतात पाणी सोडून केली जाणारी शेती. या पद्धतीत शेत पूर्णपणे पाण्याने भिजवले जाते आणि पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळते. ही पद्धत प्रामुख्याने भात, ऊस अशा पाण्याची जास्त गरज असलेल्या पिकांसाठी वापरली जाते.
उपसा सिंचन बागायत
नदी, नाला किंवा जलाशयातून पाणी उचलून (उपसा करून) शेतीसाठी वापरले जाते, त्या जमिनीला उपसा सिंचन बागायत म्हणतात. या पद्धतीत पाणी पंपांच्या साहाय्याने वर उचलून शेतात नेले जाते. नदीतील पाण्याच्या पातळीवर ही बागायत अवलंबून असते. पाणी उपलब्ध असताना पिके घेता येतात.
स्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय










































































