Last Updated on 24 Jan 2026 7:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, योजनेशी संबंधित तक्रारी व शंकांचे तात्काळ निवारण करण्यासाठी १८१ हा विशेष महिला हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १८१ या हेल्पलाइनवरून e-KYC, लाभ थांबणे, अर्जातील त्रुटी, कागदपत्रांबाबतचे प्रश्न तसेच योजनेशी संबंधित इतर अडचणींचे निरसन केले जाणार आहे. यासाठी संबंधित कॉल ऑपरेटर्सना आवश्यक ते विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, लाभार्थ्यांना अचूक व सुस्पष्ट मार्गदर्शन मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना असून, कोणत्याही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडचणींमुळे पात्र महिलांचा लाभ थांबू नये, यासाठी शासनाकडून ही अतिरिक्त सुविधा सुरू करण्यात आली आहे.
तरी, योजनेशी संबंधित कोणतीही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास लाडक्या बहिणींनी १८१ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना थेट फोनवरून मार्गदर्शन मिळणार असून, त्यांच्या समस्यांचे जलद निराकरण होण्यास मदत होणार आहे.










































































