Last Updated on 23 Jan 2026 5:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अध्यात्म, पुरातन वास्तू आणि नैसर्गिक सौंदर्याचा त्रिवेणीसंगम
इस्लामपूरपासून अवघ्या १० किमी आणि कृष्णा साखर कारखान्यापासून ७ किमी अंतरावर वसलेले बहे गाव आणि येथील रामलिंग बेट हे निसर्ग, पुरातन इतिहास आणि अध्यात्म यांचे अनोखे संमिश्र रूप म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे १ किमी लांब आणि अर्धा किमी रुंद असलेल्या दमदार खडकावर तयार झालेले हे बेट आजही निसर्गाचा अद्भुत चमत्कार वाटावे असेच आहे.
१८८४ च्या बॉम्बे गॅझेटमध्ये बहे गावाचा प्राचीन उल्लेख सापडतो. दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीला धार्मिक साहित्यामध्ये ‘बाहे’, ‘बाहोक्षेत्र’, ‘बाहूक्षेत्र’ अशी नावे दिलेली आढळतात. आज हे गाव बहे म्हणून सर्वपरिचित आहे.
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नदीतून बांधलेले कठडे आहेत. परिसरात वड, आंबा, चिंच यांची सावली आणि नदीच्या शांत लहरीतून ऐकू येणारा झंकार, येथे आल्यावर वातावरण अधिक पवित्र आणि समाधानकारक बनवतो. मंदिराच्या परिसरातील आंबा, वड, चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे. तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.

रामलिंग देवालयाचा प्राचीन इतिहास
बेटाच्या मध्यवर्ती उंच भागावर वसलेले श्री रामलिंग देवालय अत्यंत प्राचीन मानले जाते. पुराणकथेनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना या तीर्थस्थानी विसावले, स्नान केले आणि स्वहस्ते वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. त्यामुळे या स्थानास ‘रामलिंग’ हे नाव प्राप्त झाले.
१६व्या शतकात बांधले गेलेले सध्याचे मंदिर चुना आणि विटांच्या बांधकामाचे असून गाभारा व शिखरावर सुंदर नक्षीकाम आहे. विशेष म्हणजे, इतिहासात कधीही महापुराचे पाणी मंदिरात शिरल्याची नोंद नाही.
पर्यटन विकासाची नवी ओळख
कृष्णा नदीच्या मधोमध वसलेले हे बेट आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या पुढाकाराने मंदिर परिसर, रस्ते, बाग, तटबंदी, मुख्य दरवाजा, पुजारी निवास यांसह अनेक आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या. काही कामे लवकरच मार्गी लागण्याची माहिती स्थानिकांकडून मिळते.
या बेटावर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी एक मारुतीचे मंदिर आहे. प्रभू श्रीरामांनी चरणस्पर्श केलेल्या या भूमीला संत-महंतांच्या उपस्थितीमुळे अधिक पवित्र स्थान प्राप्त झाले आहे.
मारुती स्थापनेमागील रहस्यमय कथा
रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी एका कथेचा उल्लेख सापडतो. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले. पण हनुमान कुठे दिसेनात, तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले, “येथे मारुती का नाही?” तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, “यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे.” तेव्हा समर्थांनी हाक दिली, याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे –
हनुमंत पाहावयालागी आलो, दिसेना सखा थोर विस्मीत जालो। तयावीण देवालये ती उदासे, जळातूनी बोभाइला दास दासे ।।
त्यानंतर समर्थांनी बाहे गावातील गावकऱ्यांना ११ खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून मारुतीची ११ गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली. कृष्णाजीपंत बोकील कोरेगावकर तेही समर्थांबरोबर डोहात गेले. ते ११ प्रहर आत होते. मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी ११ खंडीचा नैवेद्य तयार केला न्हवता. तेव्हा मारुतीने आज्ञा केली की, कलियुगात ही मूर्ती बाहेर राहणे धोक्याचे आहे व तिची स्थापना केल्यास लोकांत भक्तीऐवजी सुवर्णमूर्ती असल्याने मोह उत्पन्न होईल. तेव्हा तिची स्थापना करु नये. ही मूर्ती परत डोहात ठेवावी. आपल्या हाताने दुसरी मूर्ती तयार करून स्थापन करावी. तेव्हा समर्थांनी ती मूर्ती परत डोहात ठेवून चुना तयार करून तिच्यासारखी दुसरी मूर्ती तयार करून बाहे (बहे) येथील रामलिंग बेटावर मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे. ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे. रेखीय अवयव, तेजस्वी व सुहास्य वदन, समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य मारुती आहे असे म्हटले जाते. समर्थांना मारुतीचे प्रत्यक्ष दर्शन बहे येथे घडले म्हणून त्यांनी १ भीमरूपी स्तोत्र या स्थानास अनुकूलन केले आहे.

रामलिंग बेटावरील यात्रा, उत्सव :
रामलिंग बेटावर ४ प्रकारचे यात्रा-उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडले जातात.
विशालतीर्थ यात्रा
पौष आमावस्येस विशाल महास्नानासाठी मोठ्या उत्साहात विशालतीर्थ यात्रा भरते.२ दिवस असणाऱ्या यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक येतात.पूर्वी बहे गावातुन नदीच्या पात्रातून पाण्याला उतार असे तेव्हा भाविक तेथून ये-जा करीत.यात्राकाळात पूर्वी पाणी जास्त असल्यास भाविकांना बेटावर सोडण्यासाठी काहीलिंचा वापर केला जाई. सध्या हा रस्ता तसा बंद असल्यासारखाच आहे.कृष्णा नदीवरती मोठा पूल आहे.त्याच्याजवळील बंधाऱ्यावरून पुलाखालून नवीन तयार झालेल्या पदरस्त्याने भाविक बेटावर ये-जा करतात. विशालतीर्थ यात्रा ही येथील सर्वात मोठी यात्रा असते.
रामजन्मोत्सव
चैत्र शुद्ध नवमी ला रामजन्मोत्सवाला अफाट गर्दी होते.
हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो.
रामदासनवमी
माघ वैद्य नवमी ला रामदासनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.
कौटुंबिक पर्यटकांची गर्दी
रामलिंग तीर्थक्षेत्र बेटातील संथ वाहणारे ‘कृष्णा माईचे’ निळेशार पाणी बोडक्या दगडावरून वाहते. तब्बल अंदाजे ४५० फूट लांबीचे पात्र या ठिकाणी कृष्णा नदीला लाभले आहे. त्यामुळे तरुण तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे. जुन्या काळातील उंच बांधलेला पूल. त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या काटेरी दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते. छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो. पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर पाण्याखाली जातो. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य आहे. अनेक हनुमान उपासक श्रावणात व शनिवारी येथे गर्दी करतात. बेटावर जाण्याकरिता नदीतुन बेटापर्यंत जाण्यासाठी एक छॊटा पुल पार करावा लागतो. पुलावरुन जाताना कृष्णेचे विशाल पात्र डोळ्यात भरते. बाजुचे फ़ेसाळणारे पाणी स्वागत करते, या विश्वात प्रवेश करताना आपल्यालाही मुक्त झाल्याचा भास होतो. बेटावर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.












































































