Last Updated on 14 Mar 2026 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड ।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखानाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष आता मतदारयादी प्रसिद्धीच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीच्या वेळी कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया पार पडली होती. त्यानुसार १२ एप्रिल २०२१ रोजी सभासदांची कच्ची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर हरकती घेण्यासाठी २२ एप्रिल २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
२७ एप्रिल २०२१ रोजी या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आणि या प्रक्रियेनंतर अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. त्या वेळी अंतिम यादीत सुमारे ४६ हजार ३४० पात्र मतदारांचा समावेश होता, तर पुरवणी यादीत ८२० सभासदांचा समावेश करण्यात आला होता.
या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच २५ मे २०२१ रोजी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार २५ मे ते १ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेणे, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे आणि अखेरीस मतदान व मतमोजणी असा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला होता. २९ जून २०२१ रोजी मतदान झाले होते.
याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीसाठीही लवकरच मतदारयादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत मतदारयादी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच टप्प्यात सभासदांची नावे, हरकती आदी मुद्द्यांवरून अनेकदा राजकीय चर्चा रंगत असतात.
दरम्यान, येत्या जून महिन्याच्या आसपास निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. सत्ताधारी गट आणि विरोधी गटांकडून सभासदांशी संपर्क वाढविणे, बैठका घेणे आणि आगामी निवडणुकीची रणनीती आखणे अशा हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर येथे अनेकदा अनपेक्षित सत्तांतर घडले असल्याचे दिसते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मतदारयादी जाहीर होण्याच्या टप्प्यापासूनच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. कारण या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.












































































