Last Updated on 06 Mar 2026 10:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
रेठरे बुद्रुक येथे अविनाश मोहितेंच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
कराड ।
अवघ्या चार महिन्यावर येवून ठेपलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलने रविवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचे आणि विजयाचा निर्धार कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची आहे. उद्यापासूनच जोमाने कामाला लागुया असे आवाहन माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी यावेळी केले.
सत्ताधारी गटाचा कार्यकाळ जून २०२६ च्या आसपास संपत असून, निवडणुकीला आता जेमतेम चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये विस्तारलेले कारखान्याचे कार्यक्षेत्र, हजारो सभासद आणि त्यावर अवलंबून असलेले ग्रामीण राजकारण पाहता, यावेळची निवडणूक चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संस्थापक पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रेठरे बुद्रुक येथे पार पडली.

ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची आहे. सत्ताधारी गटाचा हुकूमशाही कारभार रोखण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कष्टाची तयारी करा, सर्वानी जीवाचे रान करून काम करायचे आहे, असे मत अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
प्रत्येकाने स्वतः अविनाश मोहिते म्हणून निवडणूक लढवा असे आवाहन प्रमुख वक्त्यांनी यावेळी केले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा पाठिंबा शंकरराव मोहिते यांनी जाहीर करण्यात आला.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा शंकरराव मोहिते यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, भाळवणीचे ॲड. किसनराव निकम, माजी संचालक सुभाष उद्धव पाटील, माजी संचालक उदय शिंदे, तानाजी यादव, आणेचे आत्माराम देसाई, ओंडचे आप्पासो थोरात, मोहिते वडगावचे हणमंतराव मोहिते, वडगाव हवेलीचे जे. जे. जगताप, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मोहिते, रेठरे बुद्रुकचे आबा सूर्यवंशी, शिवाजीराव मोहिते, कराड दक्षिणेचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, येवलेवाडीचे बालाजी जगताप आदींची भाषणे झाली. माजी संचालक वसंतराव पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव लोकरे, तसेच अधिकराव निकम माणिक मोरे, डॉ. जयकर शिंदे, महाडिक को-ऑप क्रेडिट सोसायटीचे सचिव अमोल पाटील, भरत कदम, गजानन पाटील इस्लामपूर, बहेचे माजी सरपंच सुधीर रोकडे आदींसह कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक माजी संचालक सुभाष पाटील यांनी केले. सचिन कदम यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार नागेश कुलकर्णी यांनी मानले. प्रमुख कार्यकर्त्यांच्या या पहिल्याच बैठकीला कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
दरम्यान, कारखान्याला मोठ्या सत्तासंघर्षाची आणि सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. डॉ. सुरेश भोसले आणि आ. डॉ. अतुल भोसले यांची सद्या सत्ता आहे. येणारी निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष आहे.
खात्रीशीर बातम्यांसाठी आमचे व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा:
https://whatsapp.com/channel/0029Va5qiey1yT21NvR3Ea3S












































































