Last Updated on 07 Jan 2026 5:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
ईश्वरपूर ।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांच्या दारात शिष्टमंडळांची रीघ लागली असून, आकड्यांच्या जोरावर राजकारण रंगताना दिसत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या ‘आकड्यांचे खेळ’ जोरात सुरू आहेत. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी कार्यकर्ते आघाडीचे मोठे दावे करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात सध्या ‘दाव्यांचे’ पेव फुटले आहे. उमेदवारीसाठी नेत्यांच्या उंबरठे झिजवणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण कधीकधी अतिउत्साही कार्यकर्त्यांना नेत्यांचे ‘स्मरणशक्ती’चे डोस चांगलेच जड पडतात.
अशाच एका इच्छुक उमेदवाराचं शिष्टमंडळ अलीकडे संबंधित नेत्यांना भेटायला गेल्याची चर्चा परिसरात खमंगपणे सुरू आहे.
ती चर्चा अशी, कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराची क्षमता, गावातील पकड, संघटनात्मक ताकद याची जोरदार मांडणी केली. गावात सत्ता आपलीच आहे. समोरच्या उमेदवारापेक्षा किमान ५०० ते ७०० मतांची आघाडी निश्चित, असा ठाम दावा शिष्टमंडळाने केला.
मात्र हे सगळं ऐकून संबंधित नेत्यांनी कोणताही भाषणबाजीचा सूर न लावता, थेट एक प्रतिप्रश्न टाकला, “एवढंच वजन आहे, तर विधानसभेला याच गावातून मला मतं का कमी पडली?”
या एका प्रश्नानं सगळी आकडेमोड क्षणात कोलमडली. ५०० ते ७०० मतांची आघाडी सांगणाऱ्या शिष्टमंडळाकडे उत्तर उरलं नाही. गावातली सत्ता, ताकद आणि आत्मविश्वास एका प्रश्नात अडकला. उत्तर न सापडल्याने शिष्टमंडळ निरुत्तर अवस्थेत परतल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. यात तथ्य किती आणि राजकीय रंगत किती, हे वेगळं; पण या चर्चेने एक गोष्ट मात्र ठळकपणे अधोरेखित केली आहे. निवडणुकीत दावे मोठे असू शकतात, पण प्रश्न एकच सगळं गणित बदलू शकतो!
थोडक्यात काय तर… निवडणुकीत हवेतील दावे कागदावर टिकतातच असे नाही. राजकारणात दावे आणि प्रतिदावे कितीही असले, तरी नेत्यांच्या नजरेतून काही सुटत नाही, हेच या चर्चेने अधोरेखित केले आहे.
![]()














































































