Last Updated on 12 Feb 2026 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलापूर।
एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला, पंढरपूर आणि माळशिरसतालुक्यातील २३ गावांनी एक नवा इतिहास रचला आहे. ग्रामस्थांचा अफाट लोकसहभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे आर्थिक पाठबळ यांच्या संगमातून ‘कासाळगंगा नदी पुनर्जीवन’ प्रकल्पांतर्गत ४२ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या महाप्रकल्पामुळे केवळ कासाळगंगा नदीच प्रवाही झाली नाही, तर या भागातील हजारो हेक्टर पडीक जमीन आता फळबागांनी बहरली आहे. यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबून नागरिक पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत.
कासाळगंगा ओढ्याचे पहिल्या टप्प्यात ५ किलोमीटर लांबीचे पुनर्जीवन महूद (ता. सांगोला) ग्रामस्थांनी लोकसहभागातून केले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेल्या निधीतून डिझेल खर्चासाठी मदत झाली. पाणी उपलब्ध होत असतानाच, कामातून निघालेल्या गाळामुळे पडीक क्षेत्र लागवडीखाली आले. अतिक्रमण काढताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा पाणी महत्त्वाचे मानले गेल्याने प्रशासकीय हस्तक्षेपाची गरज भासली नाही.
टाटा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (TCS Foundation) महाराष्ट्रातील नैसर्गिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कासाळगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ४ कोटी ५७ लाख रुपये खर्चून नदीपात्रातील गाळ काढणे आणि बंधाऱ्यांचे बळकटीकरण करण्यात आले. यामुळे २४ गावे आणि ३ तालुक्यांना मोठा लाभ झाला असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी महाराष्ट्र राज्याची सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन प्रगती व्हावी; यात शेतीसाठी मोठी गुंतवणूक, जलसंवर्धन आणि उद्योगांचा विस्तार करणे, हेच देवेंद्र फडणवीस यांचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा विस्तार करून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देणे आणि सिंचन प्रकल्पांना गती देऊन महाराष्ट्राला प्रगतिशील राज्य बनवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरव महूदकरांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत केंद्र शासनाने ग्रामपंचायतीचा देशातील पहिल्या क्रमांकाच्या ‘राष्ट्रीय जल पुरस्काराने’ गौरव केला आहे.
कृषी विकासाचे महत्त्वाचे टप्पे:
कासाळगंगा नदीमुळे ११ हजारांहून अधिक हेक्टर कोरडवाहू क्षेत्राला पाणी मिळाले.
३३.६० लाख घनमीटर गाळ काढल्यामुळे ४७३ हेक्टर पडीक जमीन सुपीक झाली.
शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २० टक्क्यांनी वाढ झाली.
कटफळ गावात ढोबळी मिरचीच्या उत्पादनामुळे तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबले आहे.
महूद गावात दुग्ध व्यवसायाला तेजी आली असून जनावरांची संख्या वाढली आहे.
शासनाचे विशेष ‘कृती दल’ (Task Force) कासाळगंगा नदी बारमाही वाहती ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.














































































