Last Updated on 11 Apr 2026 11:45 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पारदर्शक ग्रामविकासाचा अध्याय; हिशोब आता थेट ‘डिजिटल’ फलकावर!
ईश्वरपूर ।
‘सत्तेचा वापर वैयक्तिक लाभासाठी नाही, तर लोकसेवेसाठी असावा’ हे ब्रीदवाक्य वाळवा तालुक्यातील जुनेखेड या गावाने प्रत्यक्ष कृतीत आणले आहे. सरपंच सौ. प्रियांका पाटील आणि त्यांचे पती अभियंता राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुनेखेड ग्रामपंचायतीने पारदर्शक कारभाराचा एक आदर्श ‘पॅटर्न’ महाराष्ट्रासमोर उभा केला असून, गावच्या विकासनिधीचा पै-पैचा हिशोब आता डिजिटल स्वरूपात थेट ग्रामस्थांसमोर मांडला जात आहे.
गावच्या विकासासाठी शासनाकडून आलेला वित्त आयोगाचा निधी, घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणारी रक्कम आणि त्याचा विनियोग कुठे झाला, याची संपूर्ण माहिती गावकऱ्यांना समजण्यासाठी गावात डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, यामुळे कारभारात कमालीची पारदर्शकता आली आहे. “पैसा कुठे खर्च होतोय, हे त्याला कळायला हवे,” हा हेतू यामागे असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.
जुनेखेडच्या या प्रयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विकासकामांमध्ये ठेकेदारांना पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे. कामे बाहेरच्या ठेकेदारांकडे न देता ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्थानिक कारागिरांच्या मदतीने पूर्ण केली जात आहेत. यामुळे खर्चात मोठी बचत होत असून, जे रस्ते इतर ठिकाणी जास्त खर्चात होतात, ते जुनेखेडमध्ये कमी खर्चात दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहेत.
केवळ विकासकामेच नव्हे, तर लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीतूनही आदर्श उभा केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रवास खर्च घेण्यास नकार दिला आहे, तर मानधनाचा त्याग करून खऱ्या अर्थाने सेवाभावी दृष्टिकोन जोपासला आहे. सुशिक्षित सरपंच असल्याने शाळेत जाऊन मुलांना धडे देण्याचे कामही त्या आवडीने करतात.

महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा
गावात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवले जात आहे. बचत गटांनी तयार केलेली उत्पादने (चिक्की, पापड इ.) ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय, गावातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख १२ ठिकाणी २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली आहे.
सुशासन हेच राष्ट्रप्रेम (Good Governance is Nationalism) हे सूत्र आम्ही स्वीकारले आहे. राजकारणापेक्षा व्यवस्था सुधारणे आणि ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणे हीच आमची प्राथमिकता आहे.
प्रियांका पाटील
सरपंच, जुनेखेड










































































