Last Updated on 14 Mar 2026 6:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
ज्या देशांनी वैज्ञानिक दृष्टीकोन न स्विकारता जे फक्त इतिहासात रममान झाले आहेत, त्या देशांची अपेक्षित प्रगती होऊ शकलेली नाही,अशी भावना माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथील राज्य परिषदेत बोलताना व्यक्त केली. अंनिसच्या विवेक वाहिनी उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी युवा पिढी उभा रहात आहे, हे आशावादी चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
उरुण ईश्वरपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विवेक वाहिनी परिषदेच्या उदघाट्न समारंभात ते बोलत होते. अंनिसचे राज्य उपाध्यक्ष प्रा.शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य आर.डी. सावंत,अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बागवे,राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे,सरचिटणीस कृष्णात स्वाती,कार्यवाह प्राचार्य डॉ.सविता शेटे,सह कार्यवाह प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले,डॉ.संतोष जेठीथोर,वाळवा एज्युकेशन सोसायटीचे सह सचिव अँड.धैर्यशील पाटील,केआरपीचे प्राचार्य डॉ.टी.जे.शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र विवेक वाहिनी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आ.पाटील पुढे म्हणाले, आपण अंनिसच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षात विवेक वाहिनी उपक्रम राबवून तरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि जबाबदार माणुसकीची मूल्ये रुजविण्याचे काम करीत आहात. जगाच्या पाठीवर मुहूर्त फक्त आपल्या भारत देशातच काढले जातात. अमेरिकेने मुहूर्त काढूनच इराणशी युद्ध चालू केले असेल का? सध्या समाज माध्यमां च्यामधून कोणताही प्रचार-अपप्रचार सहज केला जात आहे. मात्र आपणास असा समाज निर्माण करावा लागेल, तो जे वाचेल, ते खरे का खोटे याचा विचार करून स्विकार करेल. आमच्या आर आयटी कॉलेजमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून विवेक वाहिनी सुरु आहे. येथे दर आठवड्याला विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन चर्चा करतात, विचार विनिमय करतात.
संजय बनसोडे म्हणाले, विविधता ही आपल्या देशाची ताकद आहे. मात्र सध्या देशात एकच व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच झेंडा प्रस्थापित केला जात आहे. आपणास पुन्हा विविधता प्रस्थापित करावी लागेल. सध्या वैचारिक मतभेदा तून शत्रूत्व निर्माण होत आहे,हे दुर्दैवी आहे. समाजात परिवर्तन घडविण्याची, बदलाचे वारे आणण्याची हिंमत तरुणाईमध्ये आहे. विवेक वाहिनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेत राज्याच्या ४२ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.
प्राचार्य डॉ. सविता शेटे म्हणाल्या,आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच, पण कर्तव्य आधी या भूमिकेतून विवेक वाहिनी उपक्रम राबवित आहोत. यासाठी पंचसूत्री महत्वाची आहे. यावेळी आरआयटीच्या विवेक वाहिनीची सदस्या सृष्टी तेली हिने आपल्या विवेक वाहिनीचा सविस्तर आढावा मांडला.
प्रारंभी केआरपीचे प्राचार्य डॉ.टी.जे. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.सुदाम माने यांनी आभार मानले. प्रा.डॉ.लता ऐवळे, प्रा.राधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.












































































