Last Updated on 31 Dec 2025 7:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
तीस वर्षांपूर्वीच्या वर्गखोल्यांतील हशा, शिक्षकांचा दरारा आणि मैत्रीच्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत झाल्या… इस्लामपूर हायस्कूलच्या १९९६ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तीन दशकांनंतर एकत्र येत स्नेहमेळाव्यात आठवणींना उजाळा दिला. गुरुजनांच्या सन्मानाने आणि जुन्या आठवणींच्या धम्मालीनं हा दिवस प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.
ईश्वरपूर येथील इस्लामपूर हायस्कूलच्या सन १९९६ च्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा गेट-टूगेदर कार्यक्रम माणकेश्वर हॉलमध्ये झाला. अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि आठवणींनी भरलेल्या वातावरणात स्नेहमेळावा पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर एकाच छताखाली जमलेल्या वर्गमित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. निवृत्त मुख्याध्यापक एस.बी.पाटील, बी. सी.मुल्ला, ए.आर.खटावकर,जेष्ठ शिक्षक एल. के.पवार यांच्यासह निवृत्त शिक्षक उपस्थित होते.
सर्व जेष्ठ व माजी शिक्षकांचा सन्मान शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना माजी विध्यार्थी मेघा खरात व सचिन पाटील म्हणाले “आज आम्ही जे काही आहोत, त्यामागे आमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त आणि प्रेम आहे.त्यांचे संस्कार आज आमच्या आयुष्यात उपयुक्त ठरत आहेत.”
निवृत्त शिक्षिका उषा मोरे-पंडित म्हणाल्या,” आज तुम्ही विद्यार्थी दशेतून जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत आहात. आपण आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत. आपले आरोग्य जपावे. स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे.” निवृत्त मुख्याध्यापक ए.आर.खटावकर म्हणाले,”आपली उन्नती साधताना आध्यात्मिककडे वळावे. मानसिक आरोग्य सांभाळावे. जबाबदार पालकांच्या भूमिकेत रहावे.” निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना एकत्र पाहून मिळणारा आनंद शब्दांत मांडताना शिक्षक भावूक झाले.
कार्यक्रमात जुन्या वही-पुस्तकांच्या आठवणी, वर्गातील मजेशीर प्रसंग, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातील अनुभव यांची रंगतदार चर्चा झाली. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींनी आपापल्या आयुष्यातील प्रवास, यश-अपयश, कौटुंबिक व व्यावसायिक अनुभव एकमेकांशी शेअर केले.
या स्नेहमेळाव्यामुळे केवळ आठवणींना उजाळा मिळाला नाही, तर जुन्या मैत्रीला नवे बळ मिळाले. “शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून आयुष्यभर साथ देणारे नाते निर्माण करणारे मंदिर आहे,” ही भावना या गेट-टूगेदरमधून प्रकर्षाने व्यक्त झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार करत आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा अविस्मरणीय गेट-टूगेदर आनंदात संपन्न झाला.
शाळेचे वातावरण, विद्यार्थ्यांची मेहनत, अभ्यासासोबतच संस्कारांची जपणूक याबाबत आठवणींना उजाळा दिला गेला. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या खोडकर पण हुशार स्वभावाचे किस्से सांगत हास्याची लाट उसळवली. सर्व विद्यार्थी गप्पांच्या मैफलीत रमले. शाळेच्या प्रांगणात जावून वर्गात बसले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. कॅमेऱ्यात आठवणी कैद केल्या गेल्या.”










































































