Last Updated on 26 Jan 2022 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे.भारतीय वनडे आणि टी-20 कर्णधार रोहित शर्मा फिट आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेचे नेतृत्व करण्यास तयार आहे.
6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. तर 3 टी-20 सामन्यांची मालिका 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवली जाणार आहे.येत्या ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रोहित उपलब्ध आहे.
दुखापतीमुळे आफ्रिकन दौऱ्यापासून होता दूर
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी रोहितकडे वनडेचे कर्णधारपद कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. त्याआधी विराटने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला टी-20चा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, दुखापतीमुळे रोहित आफ्रिकन दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. त्याच्या जागी केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले.
अहमदाबादमध्ये पार पडणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ६ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर १६ फेब्रुवारीपासून या दोन संघात टी२० मालिका सुरू होईल आणि सर्व सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. टी२० मालिकेतील दुसरा सामना १८ फेब्रुवारीला आणि तिसरा सामना २० फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.












































































