Last Updated on 08 Mar 2026 11:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
T20 World Cup 2026 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर २५६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला. विशेष म्हणजे, सलग दोनदा (२०२४ आणि २०२६) आणि घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरला आहे.
न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन टी-२० विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली होती. त्यानंतर मोठी वाट पाहत २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात ट्राॅफी उंचावली होती तर आता सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारत पुन्हा टी-२० विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात भारताने अनेक मोठे रेकाॅर्डसही नावावर केले आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले, पण भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची वादळी भागीदारी केली. अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२ धांवाची वादळी खेळी केली. तर १८ चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. अभिषेक शर्मानंतर, संजू सॅमसनने इतिहास रचला. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८९ धावांची वादळी खेळी केली. टी २० विश्वचषकातील सलग तीन सामन्यात ५० च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
ईशान किशननेही जोरदार प्रदर्शन केले. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. तर शिवम दुबेने ८ बॉलमध्ये २६ धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं भारतीय संघाला २५५ धावांपर्यंत मजल मारता आली. हा टी-२० विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर ठरला.
२५६ धावांचे विशाल लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर पुरती दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स सारख्या घातक फलंदाजांना लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी मधल्या फळीचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला आणि भारताने ऐतिहासिक विजय साजरा केला. अभिषेक शर्माने शेवटची विकेट घेताच ८६ हजार प्रेक्षकांच्या जयघोषाने संपूर्ण अहमदाबाद दणाणून गेले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या टीमने भारताला क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी संघ बनवले आहे.










































































