Last Updated on 23 Oct 2022 8:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मेलबर्न | भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार विकेट्सने धुव्वा उडवला.अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना होता. विराट कोहली या विजयाचा हिरो ठरला.त्याने हरलेली मॅच भारताला जिंकून दिली.विराटने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या.यात 6 चौकार आणि 4 षटकार होते.
पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते.भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती.पण त्यानंतर हार्दिक आणि कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली व त्यामुळेच भारताला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवता आला. विराटने यावेळी तुफानी फटकेबाज केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.हार्दिक पंड्या यावेळी ४० धावांवर बाद झाला.
शेवटच्या ओव्हरचा थरार
भारताला अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती.त्यावेळी विराट आणि हार्दिक दोघंही मैदानात होते पण मोहम्मद नवाजच्या पहिल्याच बॉलवर हार्दिक बाद झाला त्यानंतर पुढच्या बॉलवर कार्तिकनं 1 धाव काढली तर तिसऱ्या बॉलवर विराटने 2 धावा काढल्या. त्यामुळे विजयाचे समीकरण 3 बॉल आणि 13 धावा असे होते. याचवेळी विराटने नो बॉलवर नवाजला सिक्स ठोकला आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला.पण मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट बाकी होता कारण 3 बॉलमध्ये सहा धावा हव्या असताना फ्रि हिटवर विराट बोल्ड झाला पण त्याच बॉलवर भारताला बाईजच्या रुपात 3 धावा मिळाल्या.बॉल स्टंपला लागून मागे गेला आणि त्यावर विराट आणि कार्तिकने 3 धावा काढल्या. उरले 2 बॉल 3 रन्स.त्यावेळी नवाजने वाईड बॉल टाकला आणि 2 बॉल 2 असं समीकरण बनले.पण पुढच्याच बॉलवर एक चोरटी धाव घेण्याच्या नादात कार्तिक बाद झाला.पुन्हा सामन्यात ट्विस्ट आला कारण भारताला त्यावेळी हव्या होत्या एका बॉलमध्ये 2 धावा.पण नवाजने पुन्हा एकदा वाईड टाकला आणि त्यानंतर अश्विननं विजयी फटका मारुन भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला.











































































