Last Updated on 24 Mar 2026 8:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि हिंदू जागरासाठी येत्या गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या संमेलनाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.
या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे प.पू. श्री ष.ब्र. १०८ चक्रवर्ती डॉ. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी (तपोरत्न सुक्षेत्र संस्थान हिरेमठ, म्हैसाळ) यांचे विशेष ‘संत आशीर्वचन’ भाविकांना लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू संस्कृती आणि सामाजिक एकतेवर मंथन होणार आहे.
सकाळी ठीक १० वाजता सुरू होणाऱ्या या संमेलनात कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सोहळ्याने होणार असून त्यानंतर संतांचे आशीर्वचन, पंचपरिवर्तन (कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामजिक समरसता, नागरिक कर्तव्य, स्वदेशी), महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून हिंदू धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मता यांचा संदेश देण्यात येणार आहे.
या संमेलनासाठी बहेसह नरसिंगपूर, शिरटे, कोळे, किल्ले मच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, तांबवे, लवणमाची, बेरडमाची, हुबालवाडी आणि खरातवाडी या परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आपल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि चेतना देण्यासाठी सर्व हिंदू समाजाने सहकुटुंब उपस्थित राहावे,असे आवाहन निमंत्रक सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.










































































