Last Updated on 01 Nov 2022 4:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली | देशात गेल्या महिन्यात एकुण 1 लाख 51 हजार 718 कोटी रुपये जीएसटी कर संकलन झाले असून ही रक्कम या वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या जीएसटी कराची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम आहे. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला.
या वर्षात दुसऱ्यांदा जीएसटी कराच्या संकलनानं दीड लाख कोटीचा टप्पा ओलांडला असून याआधी एप्रिल महिन्यात हा टप्पा ओलांडला गेला होता. अर्थमंत्र्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात 26 हजार 39 कोटी रुपये सीजीएसटी, 33 हजार 297 कोटी रुपये एसजीएसटी तर 81 हजार 778 कोटी रुपये आयजीएसटी कर संकलित करण्यात आला.
यामध्ये 37 हजार 297 रुपये परदेशी मालाच्या आयातीवरच्या करातून तर सेस रुपानं संकलित केलेल्या सेसचा तर 825 कोटी रुपये आयातीत वस्तूंच्या करापोटी गोळा झालेल्या निधीचाही समावेश आहे. केंद्र सरकारनं केंद्र आणि राज्याच्या पन्नास पन्नास टक्के विभागणी नुसार 22 हजार कोटी रुपये अदा केले असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या ऩऊ महिन्यांपैकी सलग 8 महिन्यांमध्ये जीएसटी कर संकलन 1 कोटी 40 लाख कोटी रुपयांच्या वर राहिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातून सर्वाधिक कर संकलन
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रातून 23 हजार 37 कोटींचा जीएसटी जमा झाला. तर, कर्नाटकमधून 10 हजार 996 कोटींचा कर जमा झाला. गुजरात राज्यातून 9 हजार 469 कोटींचा जीएसटी जमा झाला. उत्तर प्रदेशातून 7 हजार 839 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.









































































