Last Updated on 26 Feb 2026 9:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आ. जयंत पाटील यांचे सरकारला आव्हान
मुंबई ।
राज्य सरकारने दाओस येथे १८ देशातील विविध कंपन्याशी ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. त्यातून राज्यातील ४० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचे मा.राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले आहे. मग गेल्या ३-४ वर्षात दाओस येथे झालेल्या करारातून युवकांना किती रोजगार मिळाला? याची आकडेवारी सरकारने जनतेसमोर ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी केले.
आ.पाटील यांनी मा.राज्यपालांच्या अभि भाषणानंतर विधानसभेच्या सभागृहात बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केले. मा.राज्यपालांच्या अभिभाषणात स्व.अजितदादांच्या निधनाबद्दल चकार शब्द नसल्याबद्दल त्यांनी प्रथम खंत व्यक्त केली. मा.राज्यपालांच्या भाषणात दर वेळी महाराष्ट्र कर्नाटक सिमा प्रश्नाचा उल्लेख करायचा आणि प्रश्न वाऱ्यावर सोडायचा, हे योग्य नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे वकील आहेत, त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी हा प्रश्न पटलावर आणून हा प्रश्न मार्गी लावून सिमा वशियांना दिलासा द्यावा,असे भाष्य केले. यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यां साठी किमान ३० जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणीही केली.
आ.पाटील आपल्या भाषणात म्हणाले,मा. राज्यपालांच्या अभिभाषणात आपल्या महान व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख केला जातो. मात्र त्यांचे विचार स्विकारले जातात का? पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी मनकर्णिका येथे बांधलेला घाट उत्तर प्रदेश सरकारने पाडला आहे. मा. मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून हा घाट पुन्हा बांधण्यात यावा आणि याची भरपाई उत्तर प्रदेश सरकार कडून केली जायला हवी. आपण भगवान बिरसा मुंडांचे नाव घेता,मात्र आदिवासी समाजासाठी सरकारने काय केले? याचा उल्लेख अभिभाषणात कुठेच नाही.
आ.पाटील म्हणाले,नाशिक येथील कुंभ मेळ्यास २५ हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या खर्चा पेक्षा हा खर्च ५ हजार कोटी रुपयांनी जादा आहे. या कुंभ मेळ्याची विविध कामे देताना ती दुसऱ्या राज्यातील कंत्राट दारांना न देता ती राज्यातील कंत्राटदारांना देण्यात यावीत. या कुंभ मेळ्याच्या खर्चात भ्रष्टाचार होत असल्याचा सामान्य माणसाना शंका आहे. सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास आणि महिलांना पंधराशे चे एकविसे रुपये करायला पैसे नाहीत. गेल्या कुंभ मेळ्यात सीसीटीव्हीचे काम दहा कोटी रुपयात मात्र आता ते काम तीनशे कोटी रुपयावर गेले आहे. त्यांचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे.
आ.पाटील म्हणाले, आपण “महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण” बनविले. मात्र महाराष्ट्रातच सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. मैदानी खेळ बंद झाले आहेत. मोबाईलचा वापर वाढला. महाराष्ट्रा तील तरुण पिढीला पुस्तके हातात देण्याचं काम आपण केलं पाहिजे. सर्व शाळांमध्ये वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीवर सरकारने लक्ष द्यावे. कर्जत-शिरूर रस्त्याच्या धूळखात पडलेल्या प्रस्तावावर सरकारने gविचार करावा. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर अभ्यास पूर्ण भाष्य करून सरकार चे लक्ष त्याकडे वेधून घेतले.
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गांवर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री सांगतात, शक्तिपीठ महार्गाला किनाचा विरोध नाही. सगळ्या जिल्ह्यातील लोक या महामार्गाचे स्वागत करत आहेत. मग शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन का बदलले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. माझ्या मतदारसंघात कोणतेही मोठे तीर्थस्थान नाही. आमच्या तालुक्यातील जमीन ओलीताखाली आली आहे. एक इंचभरही माळरान नाही. मग आमच्या वाळवा तालुक्यातून हा महामार्ग नेण्याचा अटाहास का? निजाम शाहीच्या विरोधात लढणाऱ्या परभणी जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून पुन्हा निजामशाही अस्तित्वात आली आहे,असे लोकांना वाटू लागले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीच धरपकड सरकारने केली.










































































