Last Updated on 28 Feb 2026 5:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रंथोत्सव-2025 चे शानदार उद्घाटन, ग्रंथ दिंडी उत्साहात संपन्न
सांगली ।
मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली मायबोली आहे, आपले संस्कार आहेत. ज्याप्रमाणे आई प्रेम देते आणि वडील जगायला शिकवतात, तशीच ही भाषा आपल्याला समृद्ध करते. म्हणूनच, आपली मायबोली जपली आणि जोपासली तरच आपली खरी प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव- २०२५ चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे आयोजित या ग्रंथोत्सवास पुणे विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रेया गोखले, ग्रंथालय निरीक्षक अर्चना काळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत, केदार काकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, ग्रंथालय संघाचे संचालक पांडुरंग सूर्यवंशी, शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे उपसंचालक धनंजय माने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, ॲड. सुभाष पाटील, शांतिनिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता पाटील, विठ्ठल मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.
मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना 14 भाषा अवगत होत्या, मात्र त्यांचा राजव्यवहार मराठीतच होता. विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे, मल्टीनॅशनल व्हावे, पण आपला व्यवसाय आणि व्यवहार मराठी भाषेतच करावा. जागतिक स्तरावरही आपल्या मराठीचा डंका हवा, असे ते म्हणाले. मराठी भाषेचे महत्त्व आणि युवा पिढीची जबाबदारी यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी मराठी भाषेचे महत्व या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे ग्रंथोत्सव-2025 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या ग्रंथ, विविध पुस्तके यांच्या स्टॉलना भेट देऊन माहिती घेतली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत घेतलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता वाचन आणि भावार्थ स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी माधवनगर रोड येथून शांतिनिकेतन लोकविद्यापीठ पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे पूजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथदिंडीत साहित्यप्रेमी नागरिक, शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. कार्यक्रमास सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, ग्रंथप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ या दोन दिवशी ग्रंथोत्सव होत असून, यामधील विविध सत्रांचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












































































