Last Updated on 12 Jan 2026 10:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
आजच्या आधुनिक काळात विवाह जुळवताना पत्रिका, गुणमिलन आणि ग्रहदशा या पारंपरिक गोष्टींबरोबरच आता विज्ञानाने आणि अर्थशास्त्राने जागा घेतली आहे. मुलाचे घर, जमीन आणि पगार पाहण्यासोबतच आता वधूचे पालक मुलाचा ‘मेडिकल रिपोर्ट’ आणि ‘सिबिल स्कोअर’ तपासण्याकडे कल वाढत आहे. लग्नानंतरच्या आयुष्यात शारीरिक व्याधी किंवा आर्थिक ओझे नको, या व्यावहारिक विचारातून समाजात हा नवा बदल पाहायला मिळत आहे.
पूर्वी लग्नाची चर्चा सुरू झाली की दोन्ही बाजूंकडून पत्रिका मागवल्या जात असत. मात्र, आता सुशिक्षित कुटुंबांमध्ये पत्रिकेसोबतच मुलाच्या आरोग्याचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल मागवण्याची पद्धत रूढ होऊ होत आहे. मधुमेह, रक्तदाब, एचआयव्ही आणि काही अनुवांशिक आजारांची माहिती लग्नापूर्वीच स्पष्ट असावी, असा पालकांचा कल आहे. जीवनशैलीशी निगडित आजार तरुण वयातच बळावत असल्याने, भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी ‘हेल्थ चेकअप’ हा लग्नापूर्वीचा एक अनिवार्य भाग बनला आहे. यामुळे केवळ दोन्ही कुटुंबांमध्ये पारदर्शकता राहत नाही, तर सुदृढ पिढी निर्माण होण्यासही मदत होते.
शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्व आता मुलाच्या आर्थिक आरोग्यालाही दिले जात आहे. सध्याच्या ‘ईएमआय’ संस्कृतीमध्ये अनेक तरुण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करून कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. अशा वेळी मुलाची आर्थिक विश्वासार्हता तपासण्यासाठी त्याचा ‘सिबिल स्कोअर’ हा सर्वात मोठा आधार ठरत आहे. ज्या मुलाचा सिबिल स्कोअर ७५० च्या वर आहे, त्यालाच मुलींचे पालक लग्नासाठी पसंती देत आहेत. मुलाने यापूर्वी घेतलेली कर्जे, त्यांची वेळेवर केलेली परतफेड आणि सध्याचा कर्जाचा बोजा या सर्वांची माहिती सिबिल रिपोर्टमुळे उघड होते. लग्नानंतर गृहकर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे संसारात निर्माण होणारे तणाव टाळण्यासाठी हा ‘फायनान्शिअल बॅकग्राउंड चेक’ अत्यंत प्रभावी ठरत आहे.
आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे की, विवाह दीर्घकाळ टिकण्यासाठी केवळ ग्रहयोग किंवा आर्थिक स्थैर्य पुरेसे नाही. शारीरिक-मानसिक आरोग्य, परस्पर समजूत आणि पारदर्शकता तितकीच महत्त्वाची आहे.
एकीकडे कुंडलीतील २८ किंवा ३६ गुण जुळण्याला महत्त्व दिले जात असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष आयुष्यातील हे वास्तववादी गुण अधिक निर्णायक ठरत आहेत. पत्रिकेतील दोष काढण्यासाठी उपाय शोधले जातात, पण बिघडलेले आरोग्य आणि खराब झालेला सिबिल स्कोअर यावर त्वरित उपाय नसतो, याची जाणीव आता पालकांना झाली आहे. त्यामुळेच, आता मॅट्रिमोनिअल साईट्सवर देखील हेल्थ रिपोर्ट आणि सिबिल स्कोअरचे रकाने दिसू लागले आहेत. लग्नाच्या गाठी आता स्वर्गात नाही, तर लॅबोरेटरी आणि बँकेच्या अहवालात जुळणार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
काय असावे विवाहापूर्वीच्या ‘चेकलिस्ट’मध्ये?
मेडिकल रिपोर्ट : भविष्यातील आजार आणि सुदृढ पिढीसाठी.
सिबिल स्कोअर : आर्थिक स्थैर्य आणि कर्जाच्या कटकटीपासून मुक्तीसाठी.
पगार आणि करिअर : राहणीमान आणि सामाजिक स्तरासाठी.
पत्रिका (पर्यायी) : कौटुंबिक समाधान आणि परंपरेसाठी.











































































