Last Updated on 14 Feb 2026 11:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
मौजमस्ती करण्यासाठी बहे येथील निसर्गरम्य रामलिंग बेटावर आलेल्या महाविद्यालयीन प्रेमीयुगलांना आज, शनिवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावरच निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवताच आणि पालकांना बोलावण्याची भीती घालताच, कराड आणि वाळवा तालुक्यातील ११ प्रेमीयुगलांनी पोलिसांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. ‘आजच्या दिवस सोडा, पुन्हा असे करणार नाही’ अशी विनवणी केल्यानंतर पोलिसांनी कडक समज देऊन या सर्वांना सोडून दिले.
रामलिंग बेटावर आज शनिवार असल्याने भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होती. बेट परिसरातील गर्द झाडी आणि नदीकाठाच्या आडोशाचा फायदा घेत काही युवक-युवती दुपारी मौजमस्ती करत बसले होते. त्यावेळी निर्भया पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके हे त्यांच्या टीमसह गस्तीवर होते. पर्यटकांनी नदीकाठावर काही जोडपी मौजमस्ती करत असल्याची माहिती दिल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके, सुजाता माळी, सुनीता साळुंखे आदी पथकातील सदस्यांनी युवक-युवतींना हटकले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याची आणि पालकांना बोलावण्याची भाषा केल्यावर २२ युवक-युवतींनी तात्काळ पोलिसांसमोर लोटांगण घातले. त्यांनी “आम्हाला तिकडे नेऊ नका, आम्ही परत असे करणार नाही” अशी विनवणी केली. पोलिसांनी त्यांना कडक समज देऊन सोडून दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाची ही मोहीम सुरू आहे. कालही (१३ फेब्रुवारी) याच ठिकाणी २७ प्रेमीयुगलांना ताब्यात घेऊन कडक समज देण्यात आली होती. पोलिसांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये किंवा असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सामाजिक स्थळांवर गैरप्रकार होऊ नयेत आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखली जावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Mar 2026 11:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit कोल्हापूर । महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणून टाहो फोडून प्र... Read more











































































