Last Updated on 03 Mar 2026 6:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तो आला, तो गायला आणि त्याने ‘ईश्वरपूर’करांच्या मनावर अधिराज्य गाजवले!
अवधूत गुप्तेंचा नादखुळा! ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’वर ७ हजार रसिक बेभान
ईश्वरपूरकरांनी अनुभवली सुरांची जादू! अवधूत गुप्तेंच्या गाण्यांनी साडेतीन तास रसिक जागेवरच खिळले…
ईश्वरपूर |
तो आला, तो गायला आणि त्याने हजारो कला रसिकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले…असा अनुभव उरुण ईश्वरपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या २४ व्या संगीत महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या दिग्गज गायक “अवधूत गुप्ते – लाईव्ह ईन कॉन्सर्ट “ही संगीत मैफिल ऐकताना…पहाताना आला…अवधूत गुप्ते यांनी आयुष्य हे, शिटी वाजली, विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती, ऐका दाजीबा, आम्ही लग्नाळूपासून शिवबा राजंजी आदी मराठी माणसाच्या ओठावर रुळलेली असंख्य गाणी सादर करीत सात हजार कला रसिकांना तब्बल तीन तास खिळवून ठेवले.
यावेळी त्यांचे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारे “पत्रास कारण की”हे गीत, तसेच स्व.अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करणारे “राष्ट्रवादी सारे”हे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या..
अवधूत गुप्ते यांनी गणाधीश भालचंद्रा या गीताने कार्यक्रमांची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मन मोराचा कसा पिसारा फुलला, येड लागलं, ऊनऊन ओठातून, टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात, वर ढगाला लागली कळ, भुरूम भुरूम, पोरी जरा हळू हळू चाल, ढीपाडी ढीपांग, पाव्हणं जेवला का, नाद खुळा कोल्हापूर आदी गाणी सादर करीत रसिकांना ठेका धरायला लावला. त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना युवा गायिका अनुष्का शितूगडे, ईशानी पाटणकर, तसेच सुर नवा,ध्यास नवाचा उपविजेता, उरुण ईश्वरपूरचा सुपुत्र शुभम सातपुते यांनी सुंदर साथ दिली. दीप्ती भागवत यांनी अतिशय ओघवत्या भाषेत कार्यक्रमाचे संचालन केले.
प्रारंभी सुप्रसिद्ध डॉ.प्रसाद जगताप (सांगली), राजाराम सॉल्व्हेक्सचे विकास कर्डीले, कल्याणी बिल्डरचे संदीप पाटील (कराड), कुशिरे असोसिट्सचे दीपक कुशीरे यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उरुण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राजारामबापू सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, राजारामबापू सह.बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, युवा नगरसेवक संग्राम पाटील यांच्या हस्ते अवधूत गुप्ते यांच्यासह कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा.प्रदीप पाटील यांनी संयोजन केले.
पी.आर.पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, राजारामबापू दूध संघांचे अध्यक्ष संग्राम फडतरे, कुंडलचे जि.प.सदस्य ऋषिकेश लाड, प्राचार्य आर.डी.सावंत, डॉ.सतिश गोसावी, जि.प.सदस्या संगिता पाटील, पं.स.सदस्या सौ.सुप्रिया पाटील, माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, संजीव पाटील (कासेगाव), यांच्यासह सुमारे ७ हजार कलारसिकांनी या बहारदार कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. सदानंद गाडगीळ (सांगली) यांनी सूत्रसंचालन केले.
आविष्कार कल्चरल ग्रुपचे पदाधिकारी व सदस्यांनी अविरत कष्ट घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.
अवधूत गुप्ते यांचा वन्स मोअर
येथील कला रसिकांनी अवधूत यांच्या गाण्यांना बऱ्याच वेळा वन्स मोअर दिला. त्यांनी काही वेळा वन्स मोअर घेतला, काही वेळा नवे गाणे सुरु केले. त्यांची रसिकांशी चांगलीच गट्टी जमली त्यांनी आविष्कार आणि रसिकांचे कौतुक करीत मी तुमचा वन्स मोअर घेतला,आता तुम्ही मला पुन्हा बोलावून माझा वन्स मोअर घ्या,अशा आपल्या भावना व्यक्त केल्या… रसिकांनीही टाळ्या आणि शिट्टट्याच्या जलोषात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.












































































