Last Updated on 26 Feb 2026 9:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मराठीची “अभिजात” भाषा म्हणून कागदोपत्री नोंद झाली. शासनाने दिलेला शब्द पाळला आणि जणू शासनाची जबाबदारी संपली. पण मग विचार येतो की, एखाद्या गोष्टीची सक्ती करून यश संपादन करता येतं का? त्या गोष्टीची मुळात गोडीच असावी लागते ना? काही दिवसांनी अशी वेळ येऊ नये की, “भारतातील महाराष्ट्र या राज्यात मराठी भाषा बोलली जात होती,” असे सांगावे लागेल. ही इतकी सुंदर भाषा इतिहासजमा होणार नाहीच. या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्यामागे अनेकांचे योगदान आहे हे विसरून चालणार नाही.
आपण आपल्या भाषेचा केवळ ‘मराठी’ इतकाच उल्लेख करून चालणार नाही. ही मराठी दर बारा कोसांवर बदलणारी भाषा आहे. खेड्यापाड्यात बोलली जाणारी ही मराठी रांगडी आहे; साताऱ्याकडची थोडी राकट, कोल्हापूरची थोडी पुरुषी, कोकणातील हेल काढून बोलली जाणारी, तर पुणे-मुंबईकडची उच्चभ्रू संस्कृतीत वाढलेली थोडी शहरी. महाराष्ट्राचा विचार केला तर विविध प्रांतांत वेगवेगळ्या ढंगात ही मराठी आपल्याला ऐकायला मिळते. झपाट्याने बदलणाऱ्या या काळात आजही मराठी तितक्याच उत्साहाने बोलली जाते, याचा खूप आनंद आहे.
साधारण ६५ ते ७० वयोगटाकडे झुकलेल्या आमच्या पिढीचा विचार केला तर, ती पिढी मराठीबद्दल अत्यंत अभिमानाने बोलते. ही पिढी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतलेली! शाळा सकाळी ११ वाजता भरत असे, पण शिक्षक विद्यार्थ्यांना १० वाजताच बोलवत असत. तो एक तास म्हणजे ‘घोकंपट्टीचा’ तास! शिक्षक मुलांकडून पाढे, कविता, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वृत्त, शास्त्रातील नियम आणि गणितातील सूत्रे पाठ करून घेत असत. शिक्षक अभ्यासासारखी गंभीर गोष्ट हसत-खेळत पूर्ण करून घेत. आपण एक चांगली पिढी घडवत आहोत, याचे समाधान त्यांना मिळत असे. त्या पिढीने मराठीला खऱ्या अर्थाने इतकं ‘बोलतं’ करून ठेवलं होतं की, पुढे कधीतरी मराठी टिकावी म्हणून प्रयत्न करावे लागतील, असं स्वप्नही त्यांना पडलं नसेल. आजही एका सुरात चाललेल्या त्या पाठांतराचा ध्वनी कानात घुमतोय.
एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे आणि मातृभाषेतून लिहिणे यात खूप फरक आहे. रवींद्रनाथ टागोरांना इंग्रजी उत्तम अवगत होते, पण त्यांच्या आत्म्याचा हुंकार असलेली कविता बंगालीतच प्रगटली आणि त्याच मातृभाषेने त्यांना ‘नोबेल’ मिळवून दिले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना मिळालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार त्यांच्या ‘विशाखा’ या मातृभाषेतील काव्यसंग्रहासाठी होता. सत्यजित रे यांना फ्रेंच भाषा येत असूनही त्यांचे सर्व चित्रपट मातृभाषेतच (बंगाली) तयार झाले. आपण जेवढ्या प्रभावीपणे मातृभाषेतून व्यक्त होऊ शकतो, तेवढे दुसऱ्या भाषेतून होऊ शकत नाही. वेगवेगळ्या भाषा येणे हा समृद्ध जीवनशैलीचा भाग असला, तरी आत्मप्रकटीकरण मात्र मातृभाषेतूनच होते. मातृभाषेशी बांधलेली नाळ आपल्याला अंतर्बाह्य सशक्त आणि निकोप बनवते. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याप्रमाणेच मातृभाशाही आपली मूलभूत गरज आहे.
‘मृत्युंजय’ कादंबरीत शिवाजीराव सावंत वसंत ऋतूचे वर्णन करताना म्हणतात— “वसंत म्हणजे वर्षा ऋतूच्या शेवटच्या इंद्रधनुष्याचं पृथ्वीवर पडलेलं प्रतिबिंब!” हे वर्णन अनुभवण्यासाठी तुमच्या देही जेव्हा वसंत येईल, तेव्हा तुमच्या सोबतीला मराठी असावी लागेल. पु.ल. देशपांडे यांचे विनोद कधी तुमच्या काळजाला जाऊन भिडतील हे सांगता येणार नाही, पण त्यासाठी तुम्ही ते वाचलं पाहिजे. शास्त्रज्ञांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगितलं, पण कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ लिहून ठेवलंय, ते आपण मुखोद्गत कधी करणार? मंगेश पाडगावकरांनी जीवनावर शतदा प्रेम करायला सांगितलं, ना.धो. महानोरांनी पावसाच्या कविता लिहिल्या, वि.स. खांडेकरांची ‘ययाती’, जी.ए. कुलकर्णींच्या गूढ कथा, रणजित देसाई, ना.स. इनामदार, विश्वास पाटील यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या… मराठी साहित्य तुडुंब भरलेले आहे. ते आपण वाचलंच पाहिजे.
“उठा उठा चिऊताई” म्हणत आई-वडिलांनी आपल्याला उठवलं आणि आता आपण नातवंडांना उठवतोय. अभिजात भाषेचे निकष मराठीने पार केले आहेत. यात ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, बहिणाबाईंपासून ते शांता शेळके, इंदिरा संत आणि कुसुमाग्रज यांच्यापर्यंत सर्वांच्या योगदानाला तोड नाही. म्हणूनच मराठी आज जगातील भाषांमध्ये दिमाखाने उभी आहे. जात्यावर दळताना ओव्या गाणाऱ्या माऊलीची मौखिक ताकद जेव्हा ‘नटसम्राट’ मध्ये ‘सरकार’ म्हणून उभी राहते, तेव्हा ती मातृभाषेची खरी ताकद असते.
“कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या या जगात वावरताना मराठी काय काम करणार? ती तुमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, पण ‘स्वतःचा शोध’ घेताना तिची नितांत गरज लागेल. आज इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांशी आई-वडीलही इंग्रजीत बोलू पाहतात. पाहुण्यांसाठी केवळ ‘अंकल-आंटी’ हे दोनच शब्द उरले आहेत. या धडपडीत संवाद शुष्क होत चालला आहे आणि मुले दुरावत आहेत. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे नतमस्तक व्हावे लागते. आई-वडील आणि बाळाचे नाते हे निसर्गदत्त आहे. बाळाशी बोलताना ‘आ’ म्हणजे आई आणि ‘बा’ म्हणजे बाबा हे शब्द त्याच्या कानावर पडू द्या. ‘A for Apple’ तो काळानुसार शिकणारच आहे, पण सुरुवातीचा संवाद मातृभाषेतच हवा.
संवाद संपला की विसंवाद सुरू होतो आणि एकटेपणा वाढतो. अशा वेळी आपली मातृभाशाही स्वतःशी संवाद साधत आपल्या आत्म्याची गाठ घालून देते. सोळा वर्षांच्या ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी ‘पसायदान’ मागितले, तो आर्त कळवळा मराठीतच होता. आजच्या पिढीला “उठा उठा चिऊताई” शिकवण्यासाठी आजी-आजोबांची सावली घरात हवीच. रामायण, महाभारत आणि शिवरायांच्या गोष्टी ऐकत ही पिढी वाढायला हवी. नवी आणि जुनी पिढी यांच्यातील मराठीतील संवादच मराठीची अभिजातता टिकवून ठेवेल. “अमृतातेही पैजा जिंकणारी” ही मराठी ज्ञानोबा-तुकोबांची आहे, हे आपण विसरता कामा नये.
वंदना प्रकाश माने
राजाचे कुर्ले
7387866565
![]()










































































