Last Updated on 28 Feb 2022 10:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
इस्लामपूर (निनाईनगर) येथील ‘जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या चौथ्या दिवशीच्या सामन्यात अखेर स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) व आदिती पॅंथर्स (ओझर्डे), जय हनुमान नागरी पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर),राजारामबापू ईगल्स (कासेगाव) या चार संघांनी उपांत्य पूर्व,उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या जयंत प्रिमियर लीगचा प्रथम कोण होणार? याकडे कबड्डी क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाणे येथील राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यास निघालेल्या मुलांच्या आणि मुलींच्या सांगली जिल्हा संघाने स्पर्धेस भेट दिली.राष्ट्रीय कबड्डीपटू,माजी नगरसेवक खंडेराव जाधव (नाना),माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सौ.रुपाली खंडेराव जाधव यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्ट्सने या लिगचे आयोजन केले आहे. चौथ्या दिवशी स्व.जगदीशआप्पा पाटील रायडर्स (कामेरी) या संघाने प्रथम स्व.शरद लाहिगडे हरिकन्स (कासेगाव) व त्यानंतर आदिती पॅंथर्स (ओझर्डे) या मातब्बर संघावर प्रत्येकी ५ गुणांनी मात केली. जय हनुमान पतसंस्था टायगर्स (इस्लामपूर) या संघास पहिल्याच सामन्यात शिराळा कोब्राकडून पराभूत व्हावे लागले. तरीही टायगर्सच्या खेळाडूंनी हार न मानता स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) या मातब्बर संघासह राजेंद्रभाऊ युवा मंच फायटर्स (वाळवा) संघावर विजय मिळविला.शिराळा कोब्रा संघाच्या खेळाडूंनी ही आज जोरदार खेळ केला. त्यांनी ‘जय हनुमान’सारख्या मातब्बर संघासह राजेंद्रभाऊ युवा मंच फायटर्सला पराजित केले. स्फुर्ती रॉयल्स (जुनेखेड) ने राजेंद्रभाऊ पाटील युवा मंच फायटर्स (वाळवा) संघावर मात केली. राजारामबापू ईगल्स व स्व.शरद लाहिगडे हरिकेन्स या कासेगावच्या दोन संघात अटीतटीचा सामना होवून शेवटच्या काहीमिनिटात राजारामबापू ईगल्सने निसटता विजय मिळविला. आदिती पॅंथर्स ओझर्डे या संघास चौथ्या दिवशीच्या एकमेव सामन्यात हार पत्करावी लागली असली तरी,त्याच्या गुण संख्येमुळे त्यांनी आघाडी मारली आहे.
सांगली,मिरज कुपवाडचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी,वाळवा उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे,शिवाजी विद्यापीठचे सिमेंट सदस्य अँड.धैर्यशील पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील,पै.शिवाजी साळुंखे,पै.बबनराव तांदळे,प्रा.संजय पाटील,आरसीएफचे खेळाडू संदीप कदम,राष्टीय कबड्डीपटू सुनील कुंभार,कुमार वगरे,डॉ.अतुल मोरे,कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, बंडोपंत नांगरे,नंदकुमार पाटील (इटकरे) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रीडा प्रेमींनी कबड्डीचा आनंद घेतला.
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने, राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील (कामेरी) यांनी तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. जयराज पाटील (कामेरी) रणजित इनामदार (कामेरी),अमोल पाटील (कामेरी), सागर हेळवी (वाळवा), साईल जमादार (वाळवा),गौतम वगरे (कासेगाव),धनाजी सिध्द (ऐतवडे खुर्द),तुषार धनवडे (वाळवा), गणेश भस्मे (माधवनगर),झाकीर इनामदार (सांगली), आलम मुजावर (सांगली),निलेश देसाई (सांगली) यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशिक्षक विजय देसाई (सोन्याबापू),सदानंद पाटील,राजवर्धन लाड,प्रताप जाधव,सचिन कोळी,उमेश रासनकर,शिवाजी पाटील, फिरोज लांडगे,अजय थोरात,सुशांत कुराडे, मंगेश चौधरी,व त्यांचे सहकारी स्पर्धेचे संयोजन करीत आहेत.










































































