Last Updated on 22 Feb 2022 5:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इंदुरीकर महाराजांनी राज्यभर स्वार होवून संत गाडगे बाबांच्या धर्तीवर कीर्तन कल्लोळ उठवला की केवळ रंजन गुटिका सादर करणारे ते रंजनवादी वक्ते आहेत याबद्दल सध्या माध्यमे व सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे.
आपल्याकडे मौखिक परंपरेत कीर्तन म्हणजे यशाचे वर्णन. संत तुकाराम व रामदासांच्या काळापासून कीर्तन कला विकसित झाली.कीर्तन कारांनी पौराणिक निरूपण करीत समाजप्रबोधन केले. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या मते संत तुकाराम हे पहिले विख्यात कीर्तनकार होत. त्यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला विरोध करीत कीर्तनातून सामाजिक समतेचा प्रचार केला. प्रा. राम शेवाळकर यांनी म्हटले आहे की,कीर्तनकारांनी संतकवी आणि पंतकवी यांचे साहित्य बहुजन समाजापर्यंत पोहचवले.कीर्तनामुळे समाजाचे लालित्यपूर्ण प्रबोधन होते.रंजन व उद्बोधन करणारा कीर्तनकार हा एकपात्री बहुरूपी उपदेशक होय.
चांगल्या कीर्तनकारांकडे वक्तृत्व,संगीत,अभिनय,व्यासंग,बहुश्रुतता हवी.कीर्तन संस्थेने संत साहित्याबद्दल भक्ती व पंडित कवितेबद्दल प्रेम निर्माण केले. समाजाच्या सर्व स्तरांत बोलण्याबद्दल आवड निर्माण करण्यात कीर्तन प्रकारचा वाटा आहे.आचार्य अत्रे यांनी गाडगेबाबांचा गौरव करताना,सिंहाला पाहावे वनात,हत्तीला पाहावे रानात,गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात असे म्हटले आहे.सोपी, बाळबोध व ओघवती भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य.समाजवादाचे व्यासपीठ म्हणून त्यांची रसाळ वाणी गर्जत राहिली.त्यांचे कीर्तन म्हणजे भावना, विनोद आणि विचार यांचे महावस्त्र असे.गरीब व मध्यमवर्गीय बहुजन शेतकरी कुटुंबांना लागू होणारी आचारसंहिता हा त्यांच्या कीर्तनाचा आशय होता.त्यांची जीवननिष्ठा अत्यंत प्रबळ तर सुजाण, सभ्य व सुसंस्कृत नागरिकत्व निर्मिती अशी बोलण्याची प्रेरणा अत्यंत आधुनिक होती.परिवर्तनवादी विचार धारेचे कट्टर समर्थन करताना Socrates प्रमाणे श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे करीत ते कर्मकांडांची निरर्थकता अधोरेखित करत.
कीर्तन प्रकाराच्या या पार्श्वभूमीवर पाहिले असता इंदुरीकर महाराजांच्या सादरीकरणाची देखील काही बलस्थाने आहेत.बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्व,चारित्र्याचा,लौकिकाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.इंदुरीकर पदवीधर आहेत.शिक्षक आहेत.व्यासपीठावर ते अत्यंत साध्या पोशाखात वावरतात. श्रोत्यांना ते आपल्यापैकीच एक आहेत असे वाटतात.शांता शेळके यांनी पु.ल.देशपांडे यांच्या भाषण संग्रहाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, भाषण आनंददायी अनुभव ठरण्यासाठी प्रदीर्घ व्यासंग,संदर्भ संपन्नता,प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता महत्वाची आहे.इंदुरीकरांच्या सादरीकरणात व्यावहारिक गोष्टींचे दाखले,मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे सूक्ष्म निरीक्षण,तरल विनोद बुद्धी,हजरजबाबीपणा ठासून भरलेला आहे.चित्रपट, टी.व्ही.,मोबाईल, माध्यमे यांची संदर्भ संपन्नता कौतुकास्पद आहे.
लोकांसाठी लोकांच्या लोकभाषेत बोलताना ते सामान्य माणसाच्या जगण्याचे,रोजच्या लढाईचे वर्णन तपशिलाने करतात.युवा पिढीची व्यासनाधीनता, आत्महत्या,एकतर्फी प्रेम,राजकारण्यांचा ढोंगीपणा यांच्यावर खुमासदार विनोदी शैलीत प्रहार करतात.पूर्वी एखाद्या फाळकुटावर गाडगेबाबांचे कीर्तन होणार असे समजले की लोक बैलगाड्या करून कीर्तनाला येत हल्ली इंदुरीकरांचे कीर्तन आहे म्हटले की कीर्तन स्थळाला दुचाकी व चारचाकी गाड्यांचा वेढा पडतो. त्यांना मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे.महाराजांनी समाजातील दांभिकतेवर चढवलेला हल्ला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात.त्यांना प्रतिसाद देतात.दोन तास मनमुराद हसत राहतात.ते उत्तम व्यावसायिक,रंजनवादी वक्ते आहेत हे लक्षात घ्यावे.आशय आणि अभिव्यक्ती यांना एकत्र आणताना इंदुरीकरांनी तमाशा आणि कीर्तन या दोन्ही सादरीकरण प्रकारांचे बेमालूम मिश्रण केले आहे.कीर्तनामुळे समाज सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही हे खरे असले तरी इंदुरीकरांच्या स्टँडअप कॉमेडीच्या जवळ जाणाऱ्या सादरीकरणाने ग्रामीण श्रोत्यांची तमाशा व कीर्तन या दोन्ही प्रकारांची गरज एकत्र पूर्ण होते.
बाबासाहेब पुरंदरेच्या ‘ जाणता राजा’ च्या सादरीकरणात मावळे म्हणून वावरणारे स्थानिक मुले व कलाकार असतात तसे रंजनाला प्राधान्य देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील टाळकरी देखील स्थानिकच असतात.श्रोत्यांशी संवाद साधताना ते अनेक वेळा अनेकांना ग्राम्य शब्दांनी संबोधित करतात.इंदुरीकर हे स्टँडअप कॉमेडी च्या जवळ जाणारे Performing Artist ( सादरीकरण करणारे कलावंत ) आहेत हे लक्षात घेतले की बाजूने किंवा विरोधात बोलण्यासारखे काही नाही. चर्चा, वाद जेवढा चिघळेल त्या प्रमाणात इंदुरीकरांच्या कार्यक्रमांची संख्या वाढत जाईल.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
![]()











































































