मुंबई |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा (Hsc Exam) घेतली जाणार आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट (hall Ticket) मिळणार आहे. बुधवारी दुपारी १ च्या पुढे विद्यार्थ्यांना संबंधित शाळा आणि महाविद्यालयातून ऑनलाईन हॉलतिकीटची प्रिंट मिळणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
असे करा डाऊनलोड
सर्वात आधी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जा.त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.
बोर्डाने म्हटले आहे की,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की,उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च-एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेची प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजल्यापासून college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा,ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,मार्च-एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ) महाविद्यालयांनी इयत्ता १२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
राज्यात बारावी परीक्षांसाठी 14 लाख 72 हजार 564 विद्यार्थी बसले आहेत.यंदा ‘झिग झॅक’ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल.त्यांना चांगले वातावरण मिळेल, असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना
विद्यार्थ्यांना आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल तिकीट उपलब्ध करून घेता येतील.
प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा प्राचार्याचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
हॉल तिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो,स्वाक्षरी,विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यायचे आहे.
एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.