नवी दिल्ली ।
युवकांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे आणि त्यांना देशभरातील राष्ट्र उभारणीच्या कार्यात समाजसेवेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने,भारत सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या कालखंडात (2021-22 ते 2025-26) 1,627 कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय सेवा योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय सेवा योजना सुरु ठेवण्यासाठी मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मंत्री म्हणाले, ”राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवल्याबद्दल तसेच यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत 2022-23 च्या अर्थसंकल्पात 97 टक्के वाढ करून या योजनेला महत्व दिल्याबद्दल मंत्रालय आणि सर्व हितसंबंधितांच्या वतीने मी पंतप्रधानांचे मनःपूर्वक आ भार व्यक्त करतो.”
राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाची सुरु असलेली केंद्र पुरस्कृत योजना आहे. स्वयंसेवी समाज सेवेद्वारे विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने 1969 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेची वैचारिक दिशा महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. “मी नाही, तर तुम्ही” हिंदीत “स्वयं से पहले आप”. हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य अगदी समर्पक आहे.
साभार । पत्र सूचना कार्यालय,भारत सरकार