सांगली ।
स्वातंत्र्यापूर्वी तत्कालीन उपेक्षित बहुजन समाजाला शिक्षणातून सुधारणांच्या,विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या खा. स्व. एस. डी. पाटील यांनी समाजकारण आणि राजकारणातून सामान्य जनतेला मूलभूत सुविधा दिल्या,असे विचार पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मांडले.
येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित स्व.खा.एस. डी. पाटील यांच्या 111 व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव ॲड. बी.एस. पाटील होते. प्रारंभी एस. डी. पाटील यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. आपल्या स्वागत प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, ब्रिटिशांच्या काळात तत्कालीन समाजाचे मागासलेपण शिक्षणाने दूर होईल या उदात्त हेतूने खा. स्व. एस. डी. पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या 26 शाखा आणि सुमारे पंधरा हजार विद्यार्थी विविध शाखांमधून शिक्षण घेत आहेत, असे सांगून त्यांनी संस्थेच्या गुणात्मक प्रगतीचा आढावा मांडला.
पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले,1949 ला जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे या परिसरातील पहिले आमदार नंतर खासदार अशा महत्त्वपूर्ण पदांवर काम करताना एस डी पाटील यांनी रस्ते,पाणी,वीज,शिक्षण अशा अनेक मूलभूत सुधारणांचा पाया रचला. हा वारसा जपत एड. बी. एस.पाटील आणि ॲड. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाने पुढील काळात संस्थेविषयी निष्ठा असणारा सुसंस्कृत विचारांचा वारसा जपणारा सेवक वर्ग तयार केला असे सांगून पिंगळे यांनी आयुष्यामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि आत्मकेंद्रित दृष्टिकोन सोडून स्थितप्रज्ञता तसेच सत्ता,पद, संपत्ती आली तरी मागे वळून पाहिले पाहिजे, सामाजिक उत्तरदायित्व जपूया; असेही आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. बी.एस. पाटील म्हणाले, एस डी साहेब यांनी समाजकारणातून,विधायक कामांतून पाटबंधारे,वीज,शिक्षण व्यवस्था,समाजकारण अशा कामांबरोबरच पक्षनिष्ठा जपत कर्तृत्वाची चढती मांडणी सुरु ठेवली. सामान्यांशी सतत बांधीलकी आणि त्यांचे हित अखंड जपले; असेही मत त्यांनी मांडले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाई शहा, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,विलासराव पाटील,संपतराव पाटील,संजय पाटील, डॉ. रानोजी शिंदे आदींची उपस्थिती होती. संस्थेमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि विशेष प्राविण्य प्राप्त सेवकवर्ग यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी कृष्णात पिंगळे यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले.एस. डी. पाटील आर्किटेक्चर सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या समारंभात प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले. प्रा स्मिता डुबल व प्रा. कु. ऐश्वर्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.संस्थेचे शाखाप्रमुख,सेवक वर्ग,शिक्षक सहकारी उपस्थित होते.