Last Updated on 05 Dec 2021 5:23 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
सन २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा याशिवाय इतर परीक्षांचे आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार आहे.
राज्यातील साधारण चार लाख विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीच्या परीक्षा कधी होतील, वेळापत्रक काय असेल, सर्वाधिक पदे कोणत्या परीक्षेसाठी असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत उत्सुकता असते. त्यामुळे दरवर्षी आयोगाकडून या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर होते. २०२२ मधील स्पर्धा परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळे, यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. पण, ‘एमपीएससी’ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होतील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आयोगाकडून हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदासाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून, वर्ष होत आले. तरी राज्य सरकार व उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार तसेच अशा महत्त्वाच्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी होती. त्यातच पुण्यात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने शासनाचे वेळखाऊ धोरणामुळे आत्महत्या केली आणि त्यामुळे एमपीएससी भरतीचा मुद्दा पुढे आलेला होता. या रखडलेल्या भरती प्रक्रियांमुळे विद्यार्थ्यांने राज्यभरात आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. मात्र, आता या घटनेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे शक्य होणार आहे.

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईलया गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो,असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आले आहे.

एमपीएससी परीक्षेचे आणि निकालाचे वेळापत्रक PDF मध्ये










































































