कोरोनाचा नवा व्हेरियंट; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
नवी दिल्ली ।
आधी अल्फा,मग बीटा,मग डेल्टा आणि आता ‘ओमिक्रॉन..’कोरोनाच्या नव्या विषाणूंची ही साखळी थांबता थांबेना..आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूने सध्या सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे. WHO ने या व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत टाकले आहे. अनेक देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढला असून या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून अवघ्या जगाने सतर्कता बाळगावी,असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी सकाळी उच्चस्तरीय सरकारी अधिकार्यांची बैठक घेतली.या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा,पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा,केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल उपस्थित आहेत.
दरम्यान,नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनने दक्षिण आफ्रिका, नामीबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एसवाटिनी या आफ्रिकेतील सहा देशांतून येणारी विमाने परतविली आहेत.दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला आलेल्या दोघांना या व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे.जर्मनीने या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता चाचण्या वाढविल्या आहेत.दक्षिण आफ्रिकेत येण्या-जाण्यावर बंदी घातली आहे.
दरम्यान,इंग्लंडमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले दोन रूग्ण आढळले आहेत,इंग्लंडच्या आरोग्य सचिवांनी याबाबत माहिती दिली.साजिद जावेद यांच्या माहितीनुसार,इंग्लंडमधील आरोग्य सुरक्षा यंत्रणेला केम्सफोर्ड आणि नॉटिंगहँम इथं नव्या व्हेरियंटचे दोन रूग्ण सापडले.हे दोन्ही रूग्ण स्वत:ला अलगीकरण कक्षात असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या सुरू आहेत. शिवाय, संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना शोधण्याचा (ट्रेस) प्रयत्न केला जातोय.
दरम्यान,कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे.या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिले आहे.या विषाणूचा समावेश WHO ने ‘Variant of Concern’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.
या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की,एका शास्त्रज्ञांनी त्याचे वर्णन “भयावह” विषाणू असे केले आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचे म्हटले आहे.या विषाणूची प्रकरणे आढळण्याची नुकतीच सुरुवात झाली असून,याची लागण झालेले रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतील एकाच प्रांतामध्ये आहेत.मात्र याचा संसर्ग इतरही ठिकाणी झाला असल्याचे संकेतही मिळत आहे.