कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगार वाढ,पगार आता 10 तारखेच्या आत होणार
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
मुंबई ।
सटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे.या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारण: ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.
सर्व कामगारांनी संप मागे घ्यावा, उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर रहा असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार,सेवा समाप्ती मागे घेणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ते सध्या ऍडमिट असणाऱ्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत चर्चा केली.मंत्री परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली.यानंतर अनिल परब यांनी सहयाद्री अतिथीगृहावरती,मंत्री उदय सामंत, आ. गोपीचंद पडळकर,एस टी कामगार शिष्टमंडळ यांच्यातदेखील एक बैठक पार पडली.आणि त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली.यामध्ये त्यांनी आजच्या दिवसभरात केलेल्या चर्चांनंतर घेतलेले निर्णय सांगितले.
दरम्यान एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. कामगारांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन ही श्री. परब यांनी यावेळे केले. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन असे असेल
नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.तसेच एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे, भत्ता, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात येणार आहे.तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दहा तारखेच्या पुढे जाणार नाही तो 10 तारखेच्या आतच होईल याची हमी राज्यसरकाने घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ,त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये.त्याचे पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होते ते आता 24 हजार 594 रुपये झाले आहे.साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.
10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ.ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला.त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झाला.
20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचे स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होते. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झाले आहे. ज्यांचे मूळ वेतन 37 हजार होते आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होते.त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल,तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.
30 वर्षे किंवा त्याहून जास्त सेवा – ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.