ऑस्ट्रेलिया प्रथमच विश्वविजेता; न्यूझीलंडला सहज चारली धूळ!
पहिल्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासह ऑस्ट्रेलियाचा धमाका
दुबई |
T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली.ऑस्ट्रेलियाचे हे पहिलेच T20 विजेतेपद आहे.याआधी त्यांनी पाच वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.ऑस्ट्रेलियाने एकतर्फी लढतीत न्यूझीलंड संघाचा पराभव केला.173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच अँड कंपनीने 18.5 षटकांत 2 गडी गमावून न्यूझीलंडवर विजय मिळवला.
सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या.न्यूझीलंडसाठी केन विल्यमसनशिवाय इतर कोणताही फलंदाज धावा करण्यात फारसे योगदान देऊ शकला नाही. मार्टिन गप्टिलने 28 धावा करण्यासाठी 35 धावा खर्च केल्या. 10 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एक विकेट गमावून केवळ 57 धावा होती. न्यूझीलंडचा संघ केवळ 130-140 धावाच करू शकेल असे वाटत होते. येथून विल्यमसनने धावा काढण्याची जबाबदारी घेतली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. विल्यमसन 18व्या षटकात बाद झाला.
डेव्हिड वॉर्नर आणि मार्शच्या अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाने सहज पार करत सामन्यासह स्पर्धांही जिंकली.ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने फक्त ३८ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५३ धावा केल्या.तर मिचेल मार्शने ५० चेंडूत नाबाद ७७ धावा करून ऑस्ट्रेलियाला पहिले विजेतेपद मिळून दिले.मॅक्सवेलनेही नाबाद 28 धावांची महत्तपूर्ण खेळी केली.सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली.१९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले.वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचाही ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा होता. हेजलवूडने 4 षटकात 16 धावा देत 3 बळी घेतले.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने १७२ धावा करत टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यांनी २०१६ साली वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध केलेल्या १६१ धावांचा विक्रम मोडला.न्यूझीलंडने केलेली धावसंख्या आव्हानात्मक होती. पण या स्पर्धेचा इतिहास पाहता जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतो तोच संघ विजय मिळवतो. या सामन्यात देखील तसेच घडले.
मॅचविनिंग खेळीसह मार्शने बनवला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विक्रम
अंतिम सामन्याचा मानकरी ठरलेल्या अष्टपैलू मिचेल मार्शने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. यासह त्याने या अंतिम सामन्यात एका लक्षवेधी विक्रमाला गवसणी घातली.मार्शने या सामन्यात ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. हे टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे याच सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावून हा विक्रम बनविला होता. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध व इंग्लंडच्या जो रूटने २०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी ३३ चेंडूत अर्धशतके ठोकली होती.
विल्यमसनने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 14 वे शतक आणि या स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले.
वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला.
केन विल्यमसनची एकाकी झुंज,मार्श-वॉर्नर जोडीची कमाल
विल्यमसनची 85 ही टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील कोणत्याही कर्णधाराची सर्वात मोठी खेळी होती.
मिचेल स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता ६० धावा दिल्या. तो T20 विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता.
न्यूझीलंडचा 172 हा स्कोअर कोणत्याही टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च स्कोअर होता.
डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतील 21वे अर्धशतक झळकावले.
या विश्वचषकात वॉर्नरने २८९ धावा केल्या होत्या. कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूची टी-२० विश्वचषकातील ही सर्वोत्तम कामगिरी होती.
मार्शने 31 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे T20 विश्वचषक फायनलमधील सर्वात जलद अर्धशतक होते.