Last Updated on 22 Jun 2026 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘सहकार पॅनेल’ला ६८ ते ७२ टक्के मते मिळण्याचा अंदाज
पोल पंडित’च्या एक्झिट पोलमध्ये सहकार पॅनेलला १४ हजारांच्या मताधिक्याचा अंदाज!
पुणे ।
सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठीचे मतदान रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी अत्यंत चुरशीने पार पडले. मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आता संपूर्ण कार्यक्षेत्रात निकालाची उत्कंठा वाढली असतानाच, राज्यभरातील निवडणुकांचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करणाऱ्या ‘पोल पंडित’ संस्थेकडून या निवडणुकीचा एक्झिट पोल (निकालाचा अंदाज) जाहीर करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालीलसत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने सत्ता येण्याची शक्यता आहे.
कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १५३ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. या निवडणुकीत मुख्यत्वे डॉ. सुरेश भोसले व आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनेल’ आणि अविनाश मोहिते व सौ. अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाखालील ‘आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल’ यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. मतदान संपल्यानंतर ‘पोल पंडित’ने मतदारांशी थेट संवाद साधून हा एक्झिट पोल गोळा केला आहे.
७० टक्क्यांहून अधिक मते ‘सहकार पॅनेल’च्या पारड्यात?
‘पोल पंडित’च्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला तब्बल ६८ ते ७२ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूण आकड्यांचा विचार केल्यास या पॅनेलला सुमारे २४,५०० ते २५,५०० मते मिळू शकतात.
दुसरीकडे, सत्तांतरासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला केवळ २८ ते ३२ टक्के मतांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांना सुमारे ९,८०० ते १०,८०० मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संपूर्ण ताळेबंदानुसार, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सुमारे १४,००० ते १४,५०० मतांचे मोठे आणि निर्णायक मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पोल पंडित’च्या सर्वेक्षणानुसार सर्वच्या सर्व ६ गटांमध्ये सहकार पॅनेलने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. गटनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे:
| अ.क्र. | निवडणूक गट | जयवंतराव भोसले सहकार पॅनेल | आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल | एकूण टक्केवारी |
| १ | रेठरे हरणाक्ष-बोरगाव-ईश्वरपूर | ६५% | ३५% | १००% |
| २ | नेर्ले-तांबवे-वाठार गट | ६३% | ३७% | १००% |
| ३ | येडेमच्छिंद्र-वांगी-देवराष्ट्रे | ७२% | २८% | १००% |
| ४ | काले-कार्वे गट | ७८% | २२% | १००% |
| ५ | रेठरे बु. – शेणोली – शेरे | ७९% | २१% | १००% |
| ६ | वडगाव हवेली-दुशेरे गट | ७१% | २९% | १००% |
| एकूण सरासरी टक्केवारी | ७१% | २९% |
प्रत्यक्ष भेटी आणि विश्लेषणावर आधारित सर्व्हे
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमधील सभासद, स्थानिक राजकीय कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील जाणकार आणि प्रत्यक्ष मतदानानंतर मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर आधारित हा सर्व्हे अत्यंत बारकाईने तयार करण्यात आला आहे.
महत्त्वाची टीप : हा एक्झिट पोल अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार सादर करण्यात आला असून, सदर एक्झिट पोलमधील आकडेवारी ही अंतिम नसून केवळ निकालाचा एक कल आणि अंदाज आहे, असे ‘पोल पंडित’ संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष निकाल मतमोजणीनंतरच अधिकृतरीत्या जाहीर होईल.










































































