Last Updated on 10 Nov 2021 11:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ
मुंबई |
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्यामुळे परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते, त्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही लागू होणार आहे. अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्यमंत्री दत्ता भरणे म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्ष एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या, त्यामुळे दोन वर्षांनी वयाची मर्यादा वाढवावी अशी मागणी होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक वर्ष मुदतवाढ देण्याला मान्यता दिल्यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. पण वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या चार ते पाच हजार असते. पण राज्य लोकसेवा आयोग वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचे काम कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा कोरोनामुळे वेळेत झालेल्याच नाहीत.











































































