Last Updated on 07 May 2026 7:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
बहे येथील रामलिंग बेटावर येत्या शनिवारी, ९ मे रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. येथील शिवलिंग आणि मारुती मूर्तीचा वज्रलेप नुकताच निर्विघ्नपणे पार पडला आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी समस्त बडवे-पुजारी आणि बहे ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांनी तयारी केली आहे.
या सोहळ्याचे धार्मिक विधी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुण्यवाचन, देवता स्थापन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहेत. या वज्रलेप कार्यासाठी माजी सरपंच सुधीर रोकडे व माजी सरपंच बी.जी. पाटील यांनी मोलाची मदत केली आहे. तर धार्मिक विधींसाठी केशव देशमुख व वैजनाथ पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे. वज्रलेपाचे काम काले येथील मूर्तिकार पांडुरंग वेदपाठक यांनी केले आहे. दुपारी १२ वाजता महाआरती होईल. महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धार धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी बहे ग्रामस्थांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शनिवारपासून पुढील ७ दिवस गावामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य राहील. गावाची सात्त्विकता आणि परंपरेचा सन्मान राखण्यासाठी सर्व भाविक तसेच ग्रामस्थांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












































































