Last Updated on 01 May 2026 10:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
महाराष्ट्र दिनी राज्यातील जनगणनेच्या डिजिटल पर्वाचा शुभारंभ झाला आहे. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते स्वतःची स्वयंगणना (Self-Enumeration) करून तालुक्यातील जनगणनेच्या कार्याचा प्रारंभ करण्यात आला. भारत सरकारने यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात जनगणना करण्याचे धोरण अवलंबले असून, यामुळे नागरिकांना आता घरबसल्या आपली माहिती नोंदवण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
काय आहे ‘स्वयंगणना’ प्रक्रिया?
जनगणनेच्या या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि घरगणनेची प्रक्रिया पार पडणार आहे. नागरिक स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून अधिकृत पोर्टलवर आपली माहिती भरू शकतात. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोर्टलमध्ये १४ भाषांची सुविधा असल्याने नागरिक आपल्या मातृभाषेत माहिती भरू शकतील.
आमदार जयंत पाटील यांनी येत्या १५ दिवसांत तालुक्यातील सर्व नागरिकांनी स्वयंगणना पूर्ण करून राष्ट्रीय कर्तव्यात आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
गोपनीयतेची खात्री आणि नागरिकांचे कर्तव्य
या उपक्रमाबाबत माहिती देताना तहसीलदार सारिका रासकर यांनी स्पष्ट केले की, पोर्टलवर भरलेली नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहील. नागरिकांनी त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांनी आपली माहिती https://sc.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन भरावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.










































































