Last Updated on 09 Apr 2026 5:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यात विस्तारास मंजुरी : आ.डॉ. अतुलबाबा भोसले
कराड ।
ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र पूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या चार जिल्ह्यांपुरते मर्यादित होते. आता यामध्ये ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यांची भर पडणार असून, या नव्या तीन जिल्ह्यांमध्ये कार्यविस्तार करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी सन १९७१ साली सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा बँक गेली ५५ वर्षे सातत्याने कार्यरत असून, ग्रामीण व सर्वसामान्य घटकांचे हित जपण्याचे काम करत आहे.
बँकेच्या ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ठेवी ९५१ कोटी ३५ लाख रुपये असून, ५६१ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १,५१२ कोटी ८९ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेचे भागभांडवल १२ कोटी ३० लाख रुपये असून, स्वनिधी १३० कोटी ६३ लाख रुपये इतका आहे. तसेच बँकेला २० कोटी रुपयांचा ढोबळ नफा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, सलग १२ व्या वर्षी निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. ग्राहक सेवेसाठी बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, मोबाईल बँकिंग, यूपीआयद्वारे व्यवहार (गूगल पे, फोन पे), एटीएम सुविधा, ई-कॉमर्स, आरटीजीएस/एनईएफटी, एनएसीएच यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या चार जिल्ह्यांमध्ये २७ शाखा आणि एक विस्तारीत कक्षाद्वारे बँक सेवा देत आहे. आता रिझर्व्ह बँकेने कार्यविस्तारास मंजुरी दिल्याने लवकरच ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातही बँकेच्या नव्या शाखा सुरु करुन, ग्राहकांना अधिकाधिक सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चेअरमन आ.डॉ. भोसले यांनी दिली आहे.










































































