Last Updated on 25 Mar 2026 6:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वाळवा तालुका व कारखाना कार्य क्षेत्रातील पुरुष व महिला मल्लांच्या मॅटवरील मानधन कुस्ती स्पर्धेचे दि. २७ व २८ मार्चला आयोजन केले आहे. स्पर्धेचे उदघाट्न शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी ३ वा, तर माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते शनिवार दि.२८ रोजी सायंकाळी ७ वा.बक्षीस वितरण केले जाणार आहे. या कुस्ती स्पर्धेतील चटकदार कुस्त्या पाहण्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले. राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू कुस्ती केंद्र येथे ही स्पर्धा होणार आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील हे बडोदा विद्यापीठात कुस्तीचे चॅम्पियन होते. वाळवा तालुक्याला कुस्तीची मोठी परंपरा असून या तालुक्यातील अनेक मल्लांनी राज्यात, देशात आपल्या तालुक्याचा नांवलौकिक केलेला आहे. आपल्या तालुक्यातील नवोदित, तरुण पैलवानांना प्रोत्साहन द्यावे, त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे, या भावनेने ही स्पर्धा घेतली जात आहे.
पुरुष गटात १५ वर्षे वयोगटात ४० किलो,४५ किलो,५० किलो आणि १८ वर्षे वयोगटात ५७ किलो, ६१ किलो गटात स्पर्धा होणार आहे. तर खुल्या गटात ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो,९२ किलो, ९७ किलो व १२० किलो गटात ही स्पर्धा होणार आहे. तसेच महिला गटात १५ वर्षे वयोगटात ३५ किलो, ४० किलो,४५ किलो आणि १८ वर्षे वयोगटात ५० किलो, ५५ किलो गटात स्पर्धा होणार आहे. तर खुल्या गटात ६१ किलो, ६५ किलो, ७२ किलो, ७६ किलो गटात ही स्पर्धा होणार आहे. यातील प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह बक्षीस दिले जाईल. या प्रत्येक वजनी गटातील प्रथम विजेता मल्ल कारखाना मासिक मानधनास पात्र आहे. मात्र त्या मल्लाने कुस्ती केंद्रात रहाणे बंधनकारक आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाने बाद पद्धतीने होईल. पैलवानांची नांव नोंदणी दि.२७ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. पंच समितीचा निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीसाठी – ९८८१५५०७७०, ८६०००८६९५७ यांच्याशी संपर्क साधावा.
असे असेल वेळापत्रक
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तर, शनिवार २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. कृष्णाकाठच्या या चटकदार कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










































































