Last Updated on 13 Mar 2026 8:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याबाबत शासन सकारात्मक असून यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली.
या संदर्भात सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, केंद्र सरकारकडूनही चेक पोस्ट रद्द करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याची भूमिका शासनाने निश्चित केली आहे. मात्र, चेक पोस्ट संदर्भात पूर्वी करण्यात आलेल्या कराराची मुदत अद्याप शिल्लक असल्याने त्याबाबत कायदेशीर आणि आर्थिक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. संबंधित कंपनीशी या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून करारातील अटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे.
तसेच चेक पोस्टवर अनियमितता होत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी करारातील अटींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत ठेकेदार किंवा संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
याबाबत कायदे तज्ज्ञांचे अभिप्रायही घेण्यात आले असून विद्यमान करारातील तरतुदीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. शासनामार्फत राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याबाबत व त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.










































































