Last Updated on 12 Mar 2026 11:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सदस्य सत्यजित देशमुख यांनी यासंदर्भात मांडली होती लक्षवेधी सूचना
बिबट्यांच्या व्यवस्थापनासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई ।
सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यालगतच्या शिराळा-वाळवा परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सत्यजित देशमुख यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कुमार राजवीर हनुमंत पाटील हा मुलगा अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेत हलगर्जीपणाचा आरोप झाल्याने संबंधित वनक्षेत्रपाल पारधी यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्यात बिबट्यांच्या संख्येचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनाखाली काही प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर परिसरात बिबट्यांच्या व्यवस्थापनाचा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत असून पुढील काही महिन्यांत त्याचे परिणाम स्पष्ट होतील, असे मंत्री नाईक यांनी सांगितले.
वनमंत्री नाईक म्हणाले, बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्यातील ‘शेड्युल-१’ मधून ‘शेड्युल-२’ मध्ये समाविष्ट करण्याबाबत राज्य शासनाने भूमिका मांडली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे यासाठी आवश्यक मंजुरी मागितली जात आहे. वनतारा येथे 25 बिबटे रवाना करण्यात आले असून आणखी 25 बिबटे तेथे हलविण्यात येणार आहेत. इतर काही राज्यांनीही बिबट्यांची मागणी केली असून, केंद्राच्या परवानगीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सॅटेलाईट तंत्रज्ञान, स्टँडअलोन कॅमेरे आणि अलर्ट प्रणालीचा वापर केला जात आहे. बिबट्यांची हालचाल दिसताच एक किलोमीटरपर्यंत मोठ्या आवाजात इशारा देणारी यंत्रणा बसविण्यात येत आहे. याशिवाय वन, महसूल व पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीमही राबवली जात असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले. पूर्वी शिरूर भागात एका अधिकाऱ्याने बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जंगलात शेळ्या सोडण्याचा प्रयोग केला होता आणि काही प्रमाणात तो यशस्वी ठरला होता. तथापि, हा अंतिम उपाय नसून विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. तसेच मेंढपाळांना जंगलात जाण्यास पूर्णतः मनाई करण्याऐवजी ज्या भागात नवीन रोपटी लावलेली आहेत तेथेच निर्बंध ठेवावेत, तर ज्या भागात मोठी झाडे आहेत तेथे शेळ्या-मेंढ्यांच्या चराईला परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.










































































