Last Updated on 04 Mar 2026 8:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १,७४,४७५ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.आता प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे, प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार आहे असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.
राज्यातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्याबाबची मोहीम कधी सुरू होणार आहे,रोजगार सेवकांना जॉब कार्ड वेळेत कधी मिळणार असे प्रश्न आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केले होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्य शासन आता शेतकऱ्यांच्या रस्त्यांची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा निश्चित करून त्यांचे अचूक सीमांकन करणार आहे. यापूर्वी अनेक रस्ते केवळ नकाशावर होते, आता मात्र आता या सर्व रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर रितसर नोंद घेतली जाईल. गाव नकाशात असलेले पण अतिक्रमित झालेले रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत रस्ते अदालतींमधून ४,९६३ रस्ते मोकळे करण्यात आले असून, गेल्या तीन महिन्यांत ७,२६८ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली तालुका आणि जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, संबंधित भागाचे विधानसभा सदस्य या समितीचे अध्यक्ष असतील समित्यांना भूमी अभिलेख विभाग, प्रांत अधिकारी आणि महसूल विभागाच्या ८-९ विशेष अधिकाऱ्यांच्या टीमवर नियंत्रण ठेवण्याचे आणि मासिक बैठका घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. संपूर्ण नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक रस्त्याला एक विशिष्ट ‘युनिक कोड’ (सांकेतांक क्रमांक) दिला जाणार आहे. आतापर्यंत ६५,२०७ पाणंद रस्त्यांच्या नोंदी घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या देखरेखीखाली या कामाला गती मिळाल्याने ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. 1,74,475 शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण केले. शेतीवर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घेण्यासाठी 32,974 इतक्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेण्यात आले, मोजणी व सीमांकन करण्यात आलेल्या रस्त्यांची संख्या 12,463 असून 29 ऑगस्ट 2025 चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार रस्त्यांची एकूण संख्या 66,958 आहे. आणि आतापर्यंत 97,564 रस्त्यांना सांकेताक क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. जसे नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि ग्रामीण मार्गाला क्रमांक असतो त्याचप्रमाणे प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असणार आहे. आणि त्या क्रमांकाची नोंद आपण या ठिकाणी सर्व रेकॉर्डवर घेणार आहे, प्रत्येकाचा, गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करण्यात येईल. सांकेताक क्रमांक टाकून गावाचा मॅप त्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये लागणार आहे, मातोश्री पाणंद योजनेचेही सीमांकन करणार आहोत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वेबसाईट व मोबाईल ॲप तयार करणार आहोत. रोजगार सेवकाचा प्रश्न रोजगार हमी मंत्री यांच्याशी चर्चा करून सोडवणार आहे असेही ते म्हणाले.
या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य समीर कुणावार, प्रशांत बंब, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.












































































