Last Updated on 04 Mar 2026 3:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर/विनोद मोहिते
वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यां विरोधात ईश्वरपूरात पोलिसांनी मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी धडक कारवाई करत शहरात विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ५ जणांविरुद्ध कारवाई केली गेली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत बेदरकार वाहनचालकांना चांगलाच दणका देत एकूण १ लाख ५९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांनाही पोलिसांनी धारेवर धरत न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया केली.
मंगळवारी सकाळी कोकस हॉटेल परिसरात तर सायंकाळी सत्रे चौक वाघवाडी नाका येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये ४३ प्रकरणे नोंदवून सुमारे ४४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय यापूर्वी प्रलंबित असलेल्या २०४ प्रकरणांमधून १ लाख १५ हजार ९०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ५ जणांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहेत. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, कागदपत्रांचा अभाव, वेगमर्यादा भंग अशा विविध नियमभंगांवर ही कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली..
सदर कारवाईमध्ये वाहतूक शाखा ईश्वरपूरचे प्रभारी एपीआय अल्पेश लावंड, पीएसआय यादव, मोहिते, पाटील, पोलीस नाईक शरद बावडेकर, परशुराम ऐवळे, पोलीस कॉन्स्टेबल सलमान मुलाणी, निलेश कोणे, पंकज कांबळे, रविंद्र बनसोडे आणि संजय भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, कागदपत्रांचा अभाव, वेगमर्यादा भंग अशा विविध नियमभंगांवर कडक कारवाई केली जाईल.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विशेष मोहिमा या पुढेही राबविण्यात येणार आहेत. नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
अल्पेश लावंड
सहाय्यक पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखा ईश्वरपूर












































































