Last Updated on 04 Mar 2026 9:45 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड ।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की कोण आव्हान देणार? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले व आ. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला टक्कर देण्यासाठी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक पॅनेल’ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कृष्णा’चे संस्थापक स्व.आबासाहेब मोहिते यांच्या नातसून व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते या अविनाश मोहिते यांना साथ देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीचे नेतृत्व प्रथमच एक महिला करणार आहे.
रेठरे बुद्रुक येथे झालेल्या संस्थापक पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत कृष्णा कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना अर्चना मोहिते यांनी कार्यकर्त्यांना साद घातली. “ज्या विश्वासाने तुम्ही आजवर अविनाश दादांना साथ दिली आणि ऐतिहासिक सत्तांतर घडवले, तोच विश्वास आणि प्रेम पुन्हा एकदा द्या. आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून ही निवडणूक लढूया आणि पुन्हा एकदा विजयाचा इतिहास घडवूया,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
मोठा राजकीय वारसा…
सौ. अर्चना मोहिते यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या ‘कृष्णे’चे संस्थापक स्व. आबासाहेब मोहिते यांच्या नातसून आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवराज पाटील यांच्या भगिनी आहेत. माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांचे चुलत मामा आहेत. तर कोल्हापूरचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मावशी आहेत. त्यांनी आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रचारात अविनाश मोहिते यांच्या बरोबरीने त्या नेतृत्व करणार आहेत. एका महिलेच्या हाती निवडणुकीची सूत्रे गेल्यामुळे आता प्रचाराची आणि रणनीतीची दिशा कशी असेल, याकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला कराड, वाळवा, शिराळा, पलूस आणि खानापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना मोहितेंच्या सक्रिय सहभागामुळे कृष्णा कारखान्याच्या राजकारणात आता नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत.












































































