Last Updated on 28 Feb 2026 5:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीतील ‘स्पेंट वॉश’ प्रक्रिया न करता थेट कृष्णा नदीत सोडल्यामुळेच हे जलचरांचे हत्याकांड घडले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. डिस्टिलरीला ‘शून्य पाणी विसर्ग’ अटीवर परवाना दिला असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषी कारखान्यांचा शोध घेऊन त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीच्या पात्रात साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी प्लांटमधून विषारी पाणी सोडले जात असल्याने प्रदूषणाची पातळी भयावह वाढली आहे. हेच दूषित पाणी नागरिक, जनावरे आणि शेतीसाठी वापरले जात असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “कारखान्यांच्या डिस्टिलरी प्रकल्पातून बाहेर पडणारे ‘स्पेंट वॉश’ अत्यंत विषारी असते. नियमानुसार, कारखान्यातून एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कारखान्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुजोर कारखानदारांवर कठोर कारवाई करावी.












































































