Last Updated on 23 Feb 2026 6:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आविष्कार कल्चरल ग्रुपचा २४ वा संगीत महोत्सव दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी उरुण ईश्वरपूर येथे आयोजित केला आहे. पहिल्या दिवशी हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची युवा गायिका सायली कांबळे व युवा गायक अंकुश भारद्वाज यांचा “बॉलीवूड म्युझिकल नाईट”, तर दुसऱ्या दिवशी दिग्गज गायक अवधूत गुप्ते यांचा हिंदी-मराठी गीतांचा “लाईव्ह ईन कॉन्सर्ट”हा बहारदार लाईव्ह शो संपन्न होणार आहे. दोन्ही कार्यक्रम खा.एस. डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुल प्रांगणात सायंकाळी ठीक ६.३० वाजता सुरु होतील. ही माहिती अध्यक्ष प्रा.कृष्णा मंडले, सचिव विजय लाड यांनी दिली.
माजी मंत्री आ.जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांचे मार्गदर्शन आणि कला रसिकांच्या भक्कम पाठबळावर आविष्कारने २३ वर्षाचा माईल स्टोन पार केला आहे. आविष्कारने तब्बल १०० हून अधिक राज्यातील दिग्गज व प्रतिभावंत गायक-गायिकांच्या संगीत मैफिलींचे यशस्वी आयोजन केले असून एक मनोरंजनाचे कौटुंबिक कला दालन उभा केले आहे. आविष्कार ने तिकीट विक्रीस फाटा देत वार्षिक सभासद नोंदणीच्या माध्यमातून दर्जेदार मनोरंजनाबरोबर तालुक्याचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा जपत सांस्कृतिक चळवळीस गती दिली आहे.
सायली कांबळे व अंकुश भारद्वाज हे इंडियन आयडॉल फेम युवा व गुणी कलाकार आहेत. सायली कांबळे यांनी आये हो मेरे जिंदगी मे, ओढली चुनरिया, नाना करते प्यार, परदेशीया,सोला बरस की आदी अनेक बहारदार गाणी गायली आहेत. तर अंकुश भारद्वाज यांनी आज मौसम बडा,चोरी किया रे जिया,अभी ना जाओ छोड कर, ऐ दिल तुम बिन लगता नही आदी बहारदार गाणी गायली आहेत.
अवधूत गुप्ते हे एक प्रतिभासंपन्न मराठी गायक,संगीतकार, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी मराठी हिंदी गाण्यासाठी पार्श्वगायन केले असून त्यांनी स्वतंत्रपणे संगीत अल्बमसाठी संगीत दिले आहे. त्यांनी सिटी वाजली गाडी सुटली, कोणता झेंडा घेऊ हाती,जय जय महाराष्ट्र, आयुष्य म्हणजे चुलीवरील कढईतील कांदे पोहे, तानाजीमधील घमंड कर अशी एकापेक्षा एक सरस गाणी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत.
आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष भूषण शहा, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, सतिश पाटील, सुनिल चव्हाण, नजीर शेख, डॉ.अतुल मोरे, धनंजय भोसले, संतोष पाटील, प्रशांत पाटील, बी.आर. पाटील, संजय पाटील, विश्वास कदम, हर्षवर्धन घोरपडे, विनायक यादव, विजय नायकल, सौरभ सावंत, श्रेयस पाटील, विशाल पाटील, अक्षय पाटील, हर्षवर्धन मोहिते, प्रताप कवठेकर यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.














































































